दिल्ली-मुंबई महामार्गावर कार थांबवून एका महिलेसोबत सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील भाजप नेते मनोहरलाल धाकड यांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
व्हिडीओमध्ये धाकड महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या कारमधून बाहेर पडून संबंधित महिलेसोबत स्पष्टपणे अशोभनीय कृत्य करताना दिसत आहेत. ही घटना १३ मे २०२५ रोजी सकाळी ८:२६ वाजता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भानुपरा पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली होती. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, मनोहरलाल धाकड हे उज्जैन येथील धाकड महासभेचे महामंत्री होते. परंतु या वादग्रस्त प्रकारानंतर महासभेने त्यांना पदावरून निलंबित केल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, धाकड यांच्या पत्नी भाजप समर्थित मंदसौर जिल्हा पंचायत सदस्य आहेत. त्या वॉर्ड क्रमांक ८ मधून निवडून आल्या आहेत.