जगातील हा सर्वात लहान देश समुद्राच्या मधोमध दोन लोखंडी खांबांवर वसलेला आहे. या देशाचे नाव आहे सीलँड (Sealand). दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनने या ठिकाणी एक किल्ला म्हणजेच ‘रफ फोर्ट‘ (Roughs Tower) उभारला होता. युद्धानंतर ब्रिटनने हा किल्ला रिकामा केला आणि नंतर वेगवेगळ्या लोकांनी त्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. सीलँडला मायक्रो नेशन (सूक्ष्म राष्ट्र) म्हणून ओळखले जाते. अशा राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय मान्यता नसते आणि ते कोणत्याही अधिकृत देशाचा भाग नसतात.
रशिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठे देश आहे, तर भारत हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. पण जगातील सर्वात लहान देश कोणता हे विचारल्यास उत्तर आहे – सीलँड, जिथे केवळ 27 लोक राहतात.
इंग्लंडच्या सफोक समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर सीलँड स्थित आहे. हा एक छोटासा देश एका जुनाट आणि सध्या जर्जर अवस्थेतील किल्ल्यावर वसलेला आहे. 9 ऑक्टोबर 2012 रोजी, रॉय बेट्स नावाच्या एका व्यक्तीने स्वतःला “सीलँडचा प्रिन्स” घोषित केले होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा मायकेल बेट्स सध्या या मायक्रो नेशनचा “राजा” मानला जातो.
सीलँडचे एकूण क्षेत्रफळ फक्त 250 मीटर (0.25 चौरस किलोमीटर) आहे. आंतरराष्ट्रीय मान्यता नसतानाही या देशाची स्वतःची चलनव्यवस्था, पासपोर्ट, आणि टपाल तिकीटं आहेत. इतके लहान क्षेत्रफळ असल्यामुळे येथे कोणतीही नैसर्गिक उपजीविकेची साधनं नाहीत. मात्र सोशल मीडियाद्वारे जेव्हा जगाला या देशाविषयी माहिती मिळाली, तेव्हा अनेक लोकांनी येथील नागरिकांना मदतीचा हात दिला. देणग्यांच्या माध्यमातून आर्थिक आधार मिळाल्याने येथील जीवनमान सुधारले.
आजकाल येथे पर्यटक भेट देण्यासाठी येतात, आणि त्यामुळे येथील नागरिकांना थोडे उत्पन्न मिळू लागले आहे. सीलँडकडे स्वतःचे हेलीपॅड सुद्धा आहे. जरी सीलँडला आंतरराष्ट्रीय मान्यता नाही, तरीही ते जगातील सर्वात लहान मायक्रो नेशन मानले जाते. परंतु जर अधिकृत मान्यता प्राप्त देशांबद्दल बोलायचं झालं, तर व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे. युरोपातील इटली देशाच्या रोम शहराच्या मध्यभागी वसलेले हे राष्ट्र केवळ 0.44 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे असून अर्धा किलोमीटरपेक्षाही कमी आहे.