(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा परिसरात सध्या मुसळधार पाऊस पडत असून ठिकठिकाणी पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याच मुसळधार पावसामुळे शनिवारी खंडाळा येथील मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे संपूर्ण खंडाळा बाजारपेठ जलमय झाल्याचे चित्र दिसून आले.
या जलमय झालेल्या पाण्याची दखल घेऊन शनिवारी सायंकाळी वाटदचे माजी सरपंच अनिकेत सुर्वे यांनी आपल्या स्वखर्चाने जेसीबी व टॅक्टर आणून खंडाळा बाजारपेठेतील शेखर भडसावळे यांच्या दुकानासमोर व रस्त्याच्या पलीकडे मोठ्या प्रमाणात पाणी अडत होते ते पाणी उपसा करण्याचे काम अनिकेत सुर्वे यांनी केले. तसेच संपूर्ण खंडाळा बाजारपेठेत स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी त्यांना वाटद गावचे सरपंच अमित वाडकर, तंटामुक्ती अध्यक्ष संजय शिगवण, रिक्षा संघटना व व्यापारी बंधुनी सहकार्य केले. हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल वाटदचे माजी सरपंच अनिकेत सुर्वे यांचे संपूर्ण खंडाळा परिसरातून विशेष आभार व्यक्त करण्यात आले.