(बीजिंग)
तंत्रज्ञानाच्या आघाडीवर असलेल्या चीनने आरोग्य सेवेतही नवा इतिहास रचला आहे. सोशल मीडियावर सध्या चीनमधील एका एआय संचालित क्लिनिकचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, या क्लिनिकमध्ये एकही डॉक्टर प्रत्यक्ष उपस्थित नसताना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. हे दृश्य पाहून अनेक नेटिझन्स चीन “3026 सालात जगत आहे” अशी प्रतिक्रिया देत आहेत.
व्हायरल व्हिडीओमधील ही आरोग्य सेवा एखाद्या लहान कियोस्क किंवा केबिनसारखी आहे. रुग्ण आत प्रवेश करताच संपूर्ण उपचार प्रक्रिया एआय प्रणालीद्वारे पार पाडली जाते. सर्वात आधी रुग्ण आणि एआय सिस्टीममध्ये थेट संवाद होतो. एआय तज्ज्ञ डॉक्टरांप्रमाणे रुग्णाकडून लक्षणे, पूर्वीचे आजार, औषधांचा इतिहास आणि इतर आवश्यक माहिती विचारते.
सर्व माहिती मिळाल्यानंतर अवघ्या 60 सेकंदांत एआय सिस्टीम आजाराचे प्राथमिक निदान करते. हे निदान त्वरित दुसऱ्या ठिकाणी असलेल्या मानवी डॉक्टरांकडे पाठवले जाते. डॉक्टरांकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होते. निदान झाल्यावर रुग्णाला वेगळ्या काउंटरवर जाण्याची गरज नसून, त्याच मशीनमधून आवश्यक औषधे तात्काळ उपलब्ध करून दिली जातात.
चीन सरकारने अशा प्रकारचे 1000 हून अधिक एआय क्लिनिक देशभर उभारण्याची तयारी सुरू केली आहे. या उपक्रमामुळे मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी होणार असून, ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये जलद आरोग्य सेवा पोहोचण्यास मदत होणार आहे. तासन्तास रांगेत उभे राहण्याऐवजी काही मिनिटांत उपचार मिळणे ही आरोग्य क्षेत्रातील मोठी क्रांती मानली जात आहे.
या एआय क्लिनिकचा व्हिडीओ पाहून जागतिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. भारतातही अशा तंत्रज्ञानाची अंमलबजावणी होऊ शकते का, यावर सोशल मीडियावर मतमतांतरे व्यक्त होत आहेत. तज्ज्ञांच्या मते, गंभीर आजारांसाठी मानवी डॉक्टरांची भूमिका अत्यावश्यकच राहणार आहे. मात्र सर्दी, ताप, अंगदुखी यांसारख्या प्राथमिक आजारांसाठी एआय क्लिनिक अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी ठरू शकतात.

