(संगमेश्वर / एजाज पटेल)
नावडी येथील जुन्या ग्रामपंचायतजवळ दरडीवर विजेचा खांब उभा आहे. महामार्ग ठेकेदाराने दरड खोदाई केल्यामुळे खांब धोकादायक झाला असून त्यापासून संभाव्य असा धोका असून, अपघाताच्या प्रतीक्षेत असलेला खांब कोसळला तर मोठी दुर्घटना घडून न भरून येणारी हानी होऊ शकते. तरी याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.
महामार्ग ठेकेदाराने संगमेश्वर ते शास्त्रीपुल पर्यंत अक्षरशः जनतेच्या जीवाशी जीवघेणा खेळ मांडलाय, अशी संतप्त व तीव्र चर्चा केली जात आहे. महामार्ग ठेकेदाराच्या बेजबाबदार व नियोजन शून्य कारभाराचा नाहक अनेकांना बसत आहे. गेले चार दिवस कोसळत असलेल्या अवकाळी पावसात संगमेश्वरवासियांसह महामार्गावरून ये -जा करणाऱ्या प्रवाशी जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
महामार्गाचे काम करताना मार्गालगतच्या अनेक ठिकाणच्या दरड व डोंगराची खोदाई केल्यानंतर त्या ठिकाणी संरक्षण भिंती वा कायमस्वरूपी अन्य संरक्षण उपाय योजना न केल्याने काही ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार सुरु आहेत. माती व त्याबरोबर भले मोठे दगड तसेच डोंगर दरडीवरील उभी झाडे महामार्गांवर कोसळत आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक वाहतुकीला याचा फार मोठा फटका बसत आहे.
दोनच दिवसापूर्वी ठेकेदाराचा मनमानी कारभार निसर्गाने चव्हाट्यावर आणला आहे. एसटी स्टॅन्ड समोरून जाणाऱ्या महामार्गाचे काम करताना व आजूबाजूच्या ठिकाणची खोदाई करताना डोंगर उतारावरून येणारे पाणी थेट अनेकांच्या दुकानात शिरले होते. पाणी जाण्यासाठीचे असलेले जलवाहिनी मार्ग बुजवताना काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाचा विचार करून पर्यायी जलवाहिनी न काढल्याने अवकाळीच्या पहिल्या पावसाच्या सरी कोसळताच एसटी स्टॅन्ड देवरुख रोड, महामार्ग तसेच भाजी मार्केट मधून धो-धो पाणी वाहत होते. गुडघाभर वाहणाऱ्या पाण्यामुळे येथे नदी – नाल्याचे स्वरूप आले होते.

पारेख पेट्रोल पंपाजवळ असलेल्या मोठ्या वडाच्या झाडाजवळील माती काढून त्याची खोडे जिसीबी मशीनने कटिंग करून सोडण्यात आले. अधांतरी उभा असलेला झाड कोसळून अपघात होऊ शकतो हे ठेकेदार कंपनीच्या निदर्शनास आणून सुद्धा त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यांनी जनतेच्या जीवाशी जीवघेणा खेळच मांडला असल्याचे चित्र होते. अखेर बुधवारी संध्याकाळी त्या झाडाने आपल्याबरोबर महावितरणचे उभे असलेले सहा खांब आणि त्यावरील ११ किलोवोल्ट विजवाहिन्या सहित थेट जमिनीची भेट घेतलीच. सुदैव एवढेच म्हणावे लागेल त्यावेळी मार्गांवर वाहने आणि पादचारी नसल्याने महावितरणची आर्थिक हानी वगळता कोणती हानी झाली. तरी तब्बल 60 तास उलटून गेले अजूनही तीन गावे ठेकेदाराच्या अंदाधुंदी कारभारामुळे अंधारात आहेत.
शास्त्रीपुल येथे महामार्गालगत सुमारे 20 ते 25 मीटर उंच असलेली दरड कोसळण्याचे सत्र तर सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी पाऊस नसताना दरड कोसळून रस्त्यावर तसेच इथून प्रवाशी घेऊन जाणाऱ्या रिक्षावर आली, मात्र काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच म्हणावे लागेल. यावेळी रिक्षाचे नुकसान झाले मात्र रिक्षा चालक आणि प्रवाश्यांचे सुदैव म्हणावे लागेल. ते सुखरूप सुटले. यावेळी संतप्त लोकांनी ठेकेदाराच्या विरोधात उतरून काही काळ महामार्ग रोखून धरला होता. त्यावेळी काही पुढाऱ्यांच्या मध्यस्तीने माघार घ्यावी लागली. मात्र आजही त्या दरडीचे कोसळणे सुरु असून भविष्यात ईशालवाडी होण्याच्या भीतीत येथील लोक वावरत आहेत. मात्र ना ठेकादरला, ना लोकप्रतिनिधिना काही देणे घेणे आहे.
आता अजून एक मोठं संकट उभं राहील आहे. एसटी स्टॅन्ड समोरून जाणाऱ्या महामार्गा लागतच्या दरडीवर असलेला विजेचा खांब अपघाताच्या प्रतीक्षेत असून धोक्याची घंटा वाजवत आहे. खांबाजवळची माती उकरली गेली असून खांबाला तात्पुरता आधार देण्यात आला असला तरी तो कोसळू शकतो अशी भीती वर्तवली जात आहे. मात्र ही भीती सत्यात उतरल्यास कधीही न भरून येणारी हानी होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. एवढेच नव्हे तर महार्गालगत असे अनेक खांब अपघाताच्या प्रतीक्षेत उभे आहे. महावितरण प्रशासनाने याची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.

