( देवळे / प्रकाश चाळके )
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव ग्रुप ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने ग्रामस्थांची विविध कामे प्रलंबित राहत आहेत. सध्या कार्यरत असलेले ग्रामसेवक कायमस्वरूपी नसून आठवड्यातून केवळ दोन दिवस उपलब्ध होत असल्याने ग्रामपंचायतीचा दैनंदिन कारभार चालविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कोंडगाव ग्रुप ग्रामपंचायतीला तातडीने कायमस्वरूपी ग्रामसेवक नियुक्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
ही मागणी १५ ऑगस्टपूर्वी मान्य न झाल्यास १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामस्थांसह उपोषणाला बसणार, असा इशारा ग्रामपंचायत सदस्या हर्षा आठल्ये यांनी दिला आहे.
कोंडगाव ग्रुप ग्रामपंचायत ही संगमेश्वर तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोठ्या संख्येने नागरिकांची विविध शासकीय कामे केली जातात. मात्र, कायमस्वरूपी ग्रामसेवक उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांना विविध कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्याचे ग्रामसेवक आठवड्यातून केवळ दोन दिवस उपलब्ध असल्याने अनेक कामे वेळेत पूर्ण होत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत होण्यासाठी कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, जिल्हा परिषद रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पंचायत समिती सभापती, संगमेश्वर (देवरूख) यांना ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
१५ ऑगस्टपूर्वी कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नियुक्ती न झाल्यास पंचायत समितीसमोर शांततेच्या मार्गाने उपोषण करण्यात येईल, असा इशारा हर्षा आठल्ये यांनी दिला आहे.

