(रत्नागिरी / वार्ताहर)
विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ज्ञान मिळावे आणि जबाबदार डिजिटल नागरिक घडावेत, या उद्देशाने गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील सायबर वॉरियर क्लब आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या सायबर जागरूकता मोहिमेअंतर्गत रा. भा. शिर्के प्रशालेत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. मुख्याध्यापक के. डी. कांबळे आणि उपमुख्याध्यापिका सौ. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमात ओटीपी फसवणूक, फिशिंग, सोशल मीडिया फसवणूक, गेमिंग फ्रॉड, बनावट लिंक, क्यूआर कोडद्वारे होणारी फसवणूक, सायबर बुलिंग, डिजिटल गोपनीयता आणि सुरक्षित ऑनलाइन व्यवहार यांसारख्या सायबर सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. माहितीपूर्ण सादरीकरणासोबतच संवादात्मक सत्र आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
सायबर वॉरियर क्लबचे सदस्य स्नेहा भिडे, आर्या मोहित, राज गुरव, आयुष सनगरे, निरुपम मल्लिक, नैपुण्या खानविलकर, श्रवण बोथले, सृष्टी पाटील, गंधार चव्हाण आणि ऋग्वेद फडके यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे टाळण्यासाठी आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनांची माहिती दिली.
मजबूत पासवर्डचा वापर करणे, ओटीपी अथवा वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर न करणे, संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे तसेच सोशल मीडियाचा सुरक्षित आणि जबाबदार वापर करणे याबाबत विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा शपथ घेत डिजिटल माध्यमांचा सुरक्षित, जबाबदार आणि सजगपणे वापर करण्याची प्रतिज्ञा केली.
‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ ही मोहीम विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

