(राजापूर)
येथील नायब तहसीलदार सौ. दीपाली पंडित यांची बदली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार (शिरस्तेदार) म्हणून झाली आहे. त्यांच्या बदलीचा आदेश बुधवारी सायंकाळी मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात आला.
सौ. पंडित या केवळ महसूल विभागातील अधिकारी म्हणूनच नव्हे, तर एक समाजाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून राजापूरकरांमध्ये ओळखल्या जात होत्या. त्यांनी राजापूर तालुक्यातील शासकीय सेवेत राहून अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. उत्कृष्ठ खेळाडू म्हणूनही त्यांचे नाव लौकिकास आले आहे.
महसूल खात्याचा रूक्ष कारभार असतानाही सौ. पंडित यांनी आपल्या सहृदय आणि सेवाभावी दृष्टिकोनातून सामान्य गोरगरीब जनतेशी नेहमी आपुलकीने संवाद साधत कामकाज पार पाडले. त्यांनी महसूल विभागाला केवळ प्रशासकीय यंत्रणा न मानता, लोकांच्या अडचणी सोडवणारे केंद्र म्हणून उभे केले.
मूळच्या राजापूर तालुक्यातील रायपाटण गावच्या रहिवासी असलेल्या सौ. पंडित यांना तालुक्यातील ग्रामीण भागातील समस्या आणि गरजांची उत्तम जाण होती. त्यामुळे तहसील कार्यालयात तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नागरिकांप्रती त्यांची विशेष सहानुभूती राहिली. नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी त्यांनी प्रशासकीय प्रक्रियेची सुलभ माहिती दिली आणि शक्य त्या पातळीवर तत्पर सेवा पुरवली.
त्यांच्या बदलीने राजापूरमधील नागरिकांमध्ये एका सेवाभावी आणि लोकाभिमुख अधिकाऱ्याची उणीव भासणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. “अधिकारी म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून त्या आमच्यासाठी जवळच्या होत्या,” असे मत अनेकांनी बोलून दाखवले.