(रत्नागिरी / वार्ताहर)
शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरात समुद्राच्या पाण्यात बुडून ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना १ ऑगस्ट रोजी घडली. सुहास रघुनाथ मांडवकर (रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुहास मांडवकर यांना अनेक वर्षांपासून मद्यपानाचे व्यसन होते. १ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास किंवा त्यापूर्वी मिरकरवाडा जेटी परिसरातील समुद्राच्या पाण्यात एक व्यक्ती बुडालेल्या अवस्थेत आढळून आली.
या व्यक्तीचा चेहरा सुहास मांडवकर यांच्यासारखा दिसत असल्याची माहिती त्यांचा भाऊ दीपक रघुनाथ मांडवकर यांचे मित्र राज बिर्जे यांनी फोनवरून दिली. माहिती मिळताच दीपक मांडवकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी समुद्रात आढळलेली व्यक्ती आपला सख्खा भाऊ सहास मांडवकर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सहास मांडवकर यांना तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांना उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेची रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेबाबत पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

