(राजापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसिद्ध नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दोघा विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५,००० रुपये रोख, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या वर्षी तालुक्यातून दहावीत सर्वाधिक ९८.६० टक्के गुण मिळवत अर्थव मोरे (सरस्वती विद्यामंदिर पाचल) आणि आदिती वायबसे (अर्जुना माध्यमिक विद्यालय, कारवली) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. याआधीच गवाणकर यांनी तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना खास स्वरूपाचा गौरव देण्याची घोषणा केली होती.हा सत्कार समारंभ सरस्वती विद्यामंदिर पाचल येथे पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, अर्जुना खोरे विकास मंडळ (कारवली) आणि पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघ (मीठगवाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाटककार गंगाराम गवाणकर होते. व्यासपीठावर अशोक सक्रे (अध्यक्ष, शिक्षण मंडळ), रामचंद्र वरेकर, डॉ. विश्वास जाधव, विलास चेऊलकर, राजन लाड, राकेश दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसह संस्थांचा सन्मान
या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांसह पाचल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या छात्रालयातील विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. तसेच पाचल विभागात प्रथमच आगमन झालेल्या नाटककार गवाणकर यांचा संस्थांच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात विजय मोर्ये, विकास कोलते, सुरेश साळवी, बाबा सावंत, मुख्याध्यापक तानाजी देसाई, राजू रेडीज, राजेश तेरवण, उमेश दळवी, विद्या वाकडे, शैलेश हुंदळेकर आदींचा मोलाचा सहभाग होता..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविस्कर सर यांनी केले.