( संगमेश्वर )
संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. बैठकीत संगमेश्वर स्थानकावर एकूण ९ साप्ताहिक गाड्यांच्या थांब्याची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ५ गाड्यांच्या थांब्याचा प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येणार असून, त्यावर अनुकूल निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी स्थानिक मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत आवश्यक त्या प्रयत्नांचे आश्वासन दिले.
ही बैठक पद्मश्री गजानन माने यांच्या पुढाकारातून पार पडली. ‘निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर’ या फेसबुक समूहाचे प्रमुख संदेश जिमन यांनी या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले आहेत. या बैठकीला श्री. गंगाराम टोपरे, श्री. मुकुंद सनगरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
तसेच, मदार जंक्शन – तिरुवनंतपुरम स्पेशल (०६०१४/०६०१३) या गाडीला संगमेश्वर येथे थांबा देण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत देण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकावरील फलाट क्रमांक १ आणि २ वर डिजिटल कोच पोजिशन इंडिकेटर बसवण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. यामुळे गाड्यांच्या डब्यांची अचूक माहिती प्रवाशांना सहज मिळणार आहे.
याशिवाय, स्थानकावर तिकीट तपासनीस (TC) यांची दररोज तपासणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होणार आहे.
दरम्यान, पद्मश्री गजानन माने यांनी कोकण रेल्वे प्रशासनाकडे दोन महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. कोकण रेल्वेच्या शिल्पकारांच्या नावाचा फलक स्थानकावर लावण्याची मागणी तात्काळ मान्य करण्यात आली. तसेच, मांडवी एक्सप्रेस या गाडीला दिवा स्थानकावर थांबा देण्याची मागणीही विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले.
या निर्णयांमुळे संगमेश्वर रेल्वे स्थानकावरील सुविधा आणि सेवा मोठ्या प्रमाणात सुधारतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

