(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी संगमेश्वरमध्ये भव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. महिला, युवक, लहान मुले ते ज्येष्ठ नागरिक अशा सर्व स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
ढोल-ताशांच्या गजरात आणि “जय श्रीराम”, “छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. माबळे ते रामपेठ असा स्वागत पदयात्रेचा मार्ग ठरवण्यात आला होता. पारंपरिक वेशभूषा आणि शिस्तबद्ध सहभागामुळे शोभायात्रेला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
ही यात्रा नावडी बाजारपेठ, गणेश आळी मार्गे रामपेठ परिसरातून मार्गक्रमण करत श्री देव गणपती मंदिर ते श्री राम मंदिर पर्यंत काढण्यात आली. मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी यात्रेचे स्वागत केले.
गुढीपाडवा हा सण भारतीय संस्कृती, एकात्मता, परंपरा आणि कृषी वारशाचे प्रतीक मानला जातो. संपूर्ण शोभायात्रा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. या उपक्रमातून संगमेश्वरमध्ये परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचे सुंदर दर्शन घडले.

