(देवरूख)
जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग व शासकीय अध्यापक महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शिक्षक–शिक्षकेतर क्रीडा स्पर्धेत संगमेश्वर तालुका शिक्षकेतर संघाने अंतिम सामन्यात दणदणीत विजय मिळवत विजेतेपद पटकावले. अंतिम सामना रत्नागिरी येथील प्रमोद महाजन स्टेडियमवर पार पडला.
स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच संगमेश्वर संघाने आक्रमक, शिस्तबद्ध आणि संघभावनेचा खेळ सादर करत सलग सामने जिंकले. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संघाने अंतिम फेरीत प्रवेश करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
संपूर्ण स्पर्धेत संगमेश्वर संघाच्या खेळाडूंनी वैयक्तिक तसेच संघात्मक कामगिरीत सातत्य राखले. रणजित पवार यांनी ६८ धावा व ८ बळी घेतले, तर सचिन सुर्वे यांनी ३१ धावा व ४ बळी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सुयोग बांडागळे यांनी ५२ धावा, ३ बळी व ५ झेल घेत सर्वांगीण कामगिरी केली. याशिवाय संतोष गवंडी (३ बळी, २ झेल), सुनील जाधव (३ बळी, १ झेल), मंगेश जाधव (१ झेल), दीपक चव्हाण (१ बळी) यांनी प्रभावी खेळ केला. मनोज जाधव यांनी यष्टीरक्षक म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावत संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली.
संघाच्या यशामागे व्यवस्थापक विशाल जाधव (सोनवडे हायस्कूल) यांचे योग्य नियोजन व मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.
संगमेश्वर तालुका शिक्षकेतर क्रिकेट संघात सचिन सुर्वे (कुंभारखणी हायस्कूल), रणजित पवार (आंगवली हायस्कूल), सुयोग बांडागळे (पाध्ये स्कूल, देवरूख), सुहास लोंढे (किरबेट हायस्कूल), सुनील जाधव (कोसुंब हायस्कूल), मंगेश जाधव (बुरंबी हायस्कूल), संतोष गवंडी (देवरूख हायस्कूल), मनोज जाधव (पैसाफंड हायस्कूल), अजय गजबार (देवरूख हायस्कूल), अनंत जाधव (पैसाफंड हायस्कूल), दीपक चव्हाण व प्रदीप करंडे (दोघेही ताम्हाणे हायस्कूल) यांचा समावेश होता.
या उल्लेखनीय यशाबद्दल विविध मान्यवरांनी संगमेश्वर तालुका संघाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या असून, विजेतेपद मिळवणाऱ्या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

