(महाड)
महाड तालुक्यातील मोहोत गावात एका व्यक्तीने परसबागेत गांजाची शेती केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत शेती उध्वस्त केली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार, मोहोत गावातील श्याम सिताराम भिसे (वय ६१, रा. भिसेवाडी) याने आपल्या घराशेजारी असलेल्या परसबागेत गांजाची लागवड केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने १९ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईत पाच ते सहा फूट उंचीची, हिरव्या पानांची व उग्र वासाची गांजाची १६ झाडे जप्त करण्यात आली. तसेच कापलेली झाडे एका पांढऱ्या प्लास्टिकच्या डब्यात साठवण्यात आली होती. एकूण २ किलो ४८ ग्रॅम गांजामधून १ किलो ९८८ ग्रॅम निव्वळ वजनाचे गांजा जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजित किंमत ५० हजार रुपये आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुंगीकारक औषधे व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत कलम ८(क), २०(ब), व २०(ब)(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर महाड तालुक्यातील विविध भागांतील अनधिकृत टपऱ्यांवर सर्रासपणे गांजाची विक्री होत असतानाही त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. विन्हेरे विभाग, खाडीपट्टा, दादली पुलाजवळ, नातेखिंड आणि एमआयडीसी परिसरातील अनेक टपऱ्यांमध्ये गुटख्याच्या आडून गांजाची विक्री सुरू आहे. परंतु, अद्याप याबाबत पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही, यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. पोलिसांनी जसे गांजाची शेती उध्वस्त करून आरोपीला अटक केली, तसेच या प्रकारांवरही कठोर पावले उचलली जातील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.