(नाशिक)
राज्यातील गोरगरीब गरजू नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना यापुढील काळातही पूर्ववत सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेली शिवभोजन थाळी ही योजना बंद केली जाणार असल्याची चर्चा आहे. गरीब आणि गरजू नागरिकांसाठी शिवभोजन थाळी सुरु राहणे अत्यंत आवश्यक आहे. शिवभोजन थाळी उपक्रमामुळे भुकेलेल्यांना वेळेवर दोन घास मिळतात ही समाधानाची बाब आहे.
शिवभोजनच्या दररोज २ लक्ष थाळीसाठी वार्षिक २६७ कोटी खर्च येतो आहे. राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांचा सहानुभूतीपूर्वक पुनर्विचार करून शिवभोजन थाळी ही योजना पूर्ववत सुरु ठेवावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.