(अहिल्यानगर)
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरण व लैंगिक अत्याचाराची अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘कॉलेजला जाते’ असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या 15 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ला परिसरातील घनदाट जंगलात तब्बल पाच दिवस डांबून ठेवण्यात आले होते. राहुरी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे रात्री उशिरा छापा टाकून मुलीची सुखरूप सुटका केली असून मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
13 फेब्रुवारीपासून मुलगी होती बेपत्ता
ही घटना 13 फेब्रुवारी रोजी घडली. पीडित मुलगी सकाळी सुमारे 9 वाजता घरातून बाहेर पडली, मात्र सायंकाळपर्यंत परत न आल्याने कुटुंबीयांनी राहुरी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू करत गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची दिशा ठरवली. तपासात मुलीचे लोकेशन नाशिक जिल्ह्यात असल्याचे स्पष्ट झाले.
रामशेज किल्ल्याच्या जंगलात थरारक सुटका
18 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा नाशिक–सुरत महामार्गालगत असलेल्या रामशेज किल्ल्याजवळील दुर्गम जंगलात पोलिसांनी छापा टाकला. आरोपींच्या तावडीत पाच दिवस असलेल्या मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली. या प्रकरणात मुख्य आरोपी मुक्तार हैदर पठाण याच्यासह कौसर हैदर पठाण आणि आकाश शरद संसारे या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पीडितेचा जबाब; गुन्ह्याचे भीषण स्वरूप उघड
सुटकेनंतर दिलेल्या जबाबात पीडितेने आपल्याला पाच दिवस निर्जन जंगलात कैदेत ठेवून वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं सांगितलं. प्राथमिक तपासातही आरोपींनी मुलीवर गंभीर स्वरूपाचे अत्याचार केल्याचं निष्पन्न झालं आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO Act) तसेच भारतीय न्याय संहितेतील (BNS) गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक संजय आर. ठेंगे यांनी केले.
या घटनेमुळे संपूर्ण राहुरी तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

