( रत्नागिरी / नालासोपारा )
नियतीचा डाव कधी, कुठे, कसा फसवेल, हे कोणीही सांगू शकत नाही. असंच काहीसं नालासोपाऱ्यातील एका हसतं-खेळत्या कुटुंबासोबत घडलं. देवरुखजवळील जगबुडी नदीत कार कोसळून झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या परमेश पराडकर (वय ५१) यांचे सोमवारी उशिरा उपचारादरम्यान निधन झाले. त्यामुळे मृतांचा आकडा आता सहावर गेला असून, पराडकर कुटुंबातील तिघांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
परमेश पराडकर हे व्यवसायाने चालक होते. मुंबईत ओला-उबेरसारख्या सेवा गाड्यांवर ते चालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नी मेधा पराडकर यांचा पिझ्झा व बर्गर विक्रीचा व्यवसाय होता. त्यांनी नालासोपाऱ्यात खाद्यपदार्थ विक्रीसाठी स्वतःची गाडी सुरू केली होती आणि अनेकांना टिफिन सेवाही पुरवत होत्या. मेहनती, सुस्वभावी आणि मदतशील म्हणून हे कुटुंब परिसरात अत्यंत लोकप्रिय होतं.
या दुर्घटनेत पराडकर दांपत्यासोबतच त्यांचा मुलगा सौरव पराडकर (वय २३) याचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सौरव काही वर्षांपूर्वीच बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीला लागला होता. संपूर्ण कुटुंबाने नुकताच नालासोपाऱ्यात नवीन फ्लॅट घेतला होता. आनंदी संसाराच्या स्वप्नात अचानक काळानं कडवट वास्तव घालून दुःखद पूर्णविराम दिला.
या कुटुंबाचा देवरुख येथे नातेवाईक मोहन चाळके यांचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी पराडकर आणि मोरे कुटुंबीय गावी निघाले होते. मात्र, वाटेतच नियतीनं घात केला. मेधा पराडकर या चाळके यांची मानस कन्या होत्या. या अपघाताने रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखपासून ते मुंबईतील नालासोपारा परिसरापर्यंत शोककळा पसरली आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये पराडकर कुटुंबातील तिघांशिवाय आणखी दोन जणांचा समावेश असून, चालक परमेश पराडकर यांच्या विरोधात अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.