( छत्रपती संभाजीनगर )
जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथे दसऱ्याच्या दिवशीच भीषण दुर्घटना घडली. तलावात बुडून चार बालकांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दसऱ्याच्या निमित्ताने गावातील काही मुले ट्रॅक्टर धुण्यासाठी तलावातील बॅकवॉटरमध्ये गेली होती. मात्र, या वेळी एकामागोमाग चारही मुले पाण्यात बुडाली. या अपघातात प्राण गमावलेली मुले वयाने ९ ते १७ वर्षांदरम्यानची होती.
बुडालेल्या मुलांची नावे : व्यंकटेश दत्तात्रय तारक (वय ११), इरफान इसाक शेख (वय १७), इम्रान इसाक शेख (वय १२), जैनखान हयात खान पठाण (वय ९)
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. शोधमोहीम सुरू करण्यात आली असून कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. दसऱ्यासारख्या सणाच्या दिवशीच मृत्यूचे सावट कोसळल्याने गावात वातावरण अत्यंत शोकाकुल झाले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे नद्या, नाले आणि तलाव ओसंडून वाहत आहेत. अशा परिस्थितीत वाहत्या पाण्यात जाणे किंवा पाण्याशी खेळणे जीवघेणे ठरू शकते, असा इशारा प्रशासनाकडून वेळोवेळी दिला जात आहे. सोशल मीडियावरही अशा धोकादायक घटनांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

