(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मे महिन्यातील उकाड्याने त्रस्त झालेल्या कोकणवासीयांना मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसाने गाठले. खेड, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यांमध्ये मुसळधार सरींचा मारा झाला असून, या अनपेक्षित पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. विशेष म्हणजे आडवली येथे दरड कोसळून कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. प्रवाशांना दोन तासांपासून प्रतीक्षालयात अडकून राहावे लागत आहे.
सकाळपासून वातावरणात बदल जाणवू लागला होता. मात्र दुपारी दोननंतर वातावरणात अचानक बदल झाला. काळेभोर ढगांनी आकाश व्यापले आणि वादळी वाऱ्याच्या साथीने पावसाने झडप घातली. बाजारपेठा, वाहतूक व्यवस्था, आणि नागरिकांचे दैनंदिन व्यवहार काही काळासाठी थांबले. सुट्टीमुळे गावाकडे आलेले चाकरमानी मौजमजा करण्यासाठी घराबाहेर पडले होते, मात्र अवकाळीने त्यांची पूर्णपणे धांदल उडवली.

कोकण रेल्वेच्या मार्गावर आडवली येथे दरड कोसळल्याने रेल्वेसेवा दोन तासांपासून बंद आहे. परिणामी, प्रवाशांच्या गाड्या थांबवण्यात आल्या असून, एकामागोमाग रेल्वे रांगा लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रवासी अस्वस्थ झाले असून, त्यांना कोणतीही स्पष्ट माहिती न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
हवामान विभागाने मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्याचा इशारा आधीच दिला होता. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहता अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आज सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. मात्र, दुपारी पावसाने जी झड दिली, त्याने संपूर्ण जिल्ह्याला हलवून टाकले. कोकण रेल्वे प्रशासनाकडून मार्ग लवकरात लवकर मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू असून, दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.


