(ठाणे)
अंबरनाथ (पूर्व) परिसरात एका ५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेजारी राहणाऱ्या आरोपीने “बागेत फिरायला नेतो” असा बहाणा करून मुलीला घराबाहेर नेले आणि निर्जन झाडाझुडपात ओढत नेऊन अत्याचार केला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला काही तासांत अटक केली आहे.
अटक आरोपीचे नाव तरबेज मोहमद अब्दुल कलाम अन्सारी (22) असे असून तो मूळचा झारखंड राज्यातील राहणारा आहे. १५ दिवसांपूर्वी तो कामानिमित्त झारखंडहून अंबरनाथमध्ये आपल्या वडिलांकडे आला होता.
८ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते ४ च्या सुमारास आरोपीने मुलीच्या घरी जाऊन तिला “बागेत खेळायला नेत आहे” असे सांगितले. त्यानंतर त्याने मुलीला एकांत ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. केवळ इतकेच नव्हे, तर मुलीला ठार मारण्याची धमकी देत तो घटनास्थळावरून पसार झाला. अत्याचारानंतर पीडित मुलगी भीतीने व्याकुळ झाल्याचे पाहून तिच्या आईने अधिक चौकशी केली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तत्काळ कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
कायदेशीर कारवाई
तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी BNS 65(2), 351(3), तसेच POCSO कलम 4, 6 आणि 8 अंतर्गत गुन्हा नोंदवला. तपास अधिकारी एपीआय चित्रा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आरोपीचा काही तासांत शोध लावून अटक केली. ९ डिसेंबर रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

