(मुंबई)
राज्यात खाजगी वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार लवकरच “पार्किंग पॉलिसी” लागू करणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
सोमवारी (१९ मे) पार पडलेल्या बैठकीत मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) क्षेत्रात ही धोरण कशी प्रभावीपणे राबवता येईल, यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, “एमएमआरमध्ये पार्किंग हा गंभीर प्रश्न बनला आहे. त्यामुळे याठिकाणी प्रथम पार्किंग धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणानुसार पार्किंगची जागा नसेल, तर वाहनाची नोंदणी करता येणार नाही. जगातील अनेक देशांमध्ये पार्किंगसाठी स्पष्ट धोरणं आहेत. मात्र आपल्या देशात अशी अंमलबजावणी अद्याप झाली नाही. त्यामुळे या पॉलिसीची सुरुवात एमएमआरमधून करून नंतर ती संपूर्ण महाराष्ट्रभर लागू केली जाईल.”
पार्किंगची जागा नसताना नवीन वाहन खरेदीवर बंधन आणणाऱ्या या प्रस्तावित पार्किंग पॉलिसीमुळे शहरी वाहतूक व्यवस्थेत शिस्त निर्माण होण्याची आणि पर्यावरणीय तसेच नागरी सुविधांवरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान मंत्री सरनाईक यांनी परिवहन खात्यात झालेल्या बदल्यांबाबतही माहिती दिली. “बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे केल्या गेल्या असून, त्यामध्ये कोणतीही हस्तक्षेपाची शक्यता नाही. गरोदर महिला कर्मचाऱ्यांसाठी आम्ही सहानुभूतीपूर्ण भूमिका घेत आहोत. त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पोड टॅक्सी आणि वाहतूक सुविधांसाठी पुढाकार
एमएमआरमध्ये पोड टॅक्सी प्रकल्प राबवण्याचा सरकारचा गंभीर विचार आहे, असेही त्यांनी नमूद केले. “या प्रकल्पासाठी आम्ही एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या उपक्रमाला हिरवा कंदील दाखवला आहे,” अशी माहिती सरनाईक यांनी दिली.