(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या नागपूर कार्यालयातील दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात सादर झालेल्या लावणी नृत्याच्या व्हायरल व्हिडिओमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. या वादानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे या प्रकरणावर भाष्य करत कार्यकर्त्यांना शिस्तीचा कानमंत्र दिला.
अहमदनगर जिल्ह्यातील आमदार सना मलिक यांच्या मतदारसंघातील पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना पवार म्हणाले,
“आपल्याकडून कुठलीही चूक होऊ देऊ नका. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. संविधानाचा आदर करा आणि विकासाच्या कामांवर लक्ष केंद्रित करा.” त्यांचे हे वक्तव्य नागपूरच्या लावणी वादाशी जोडले जात असून, कार्यकर्त्यांसाठी ते अप्रत्यक्ष संदेश मानले जात आहे.
नागपूर येथील नव्या राष्ट्रवादी कार्यालयात दिवाळी मिलनाच्या निमित्ताने छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सत्कारानंतर कार्यकर्ती शिल्पा शाहीर यांनी “वाजले की बारा” आणि “मला इश्काच्या झुल्यात झुलवा” या लोकप्रिय लावणी गाण्यांवर नृत्य सादर केले. शहराध्यक्ष अनिल अहिरकर आणि पदाधिकारी उपस्थित असताना टाळ्या-शिट्या वाजवल्या गेल्या.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट पसरली. अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असताना सत्ताधारी पक्ष कार्यालयात ‘लावणीचा जल्लोष’ योग्य नसल्याची टीका झाली. “बळीराजासाठी आवाज नाही, पण लावणीसाठी वेळ आहे का?” असे उपरोधिक प्रश्न विचारले जाऊ लागले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या प्रकरणाची दखल घेत शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
दरम्यान, महिला शहराध्यक्षा सुनीता येरणे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, “दिवाळी मिलन हा घरगुती कार्यक्रम होता. कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून लावणी सादर झाली. लावणी ही महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आहे; मात्र, पक्षकार्यालय ही जागा चुकीची ठरली. आम्ही दिलगीरी व्यक्त करतो आणि भविष्यात असा प्रकार होणार नाही.”
अनिल अहिरकर यांनीही “लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे” असे म्हणत आपली भूमिका मांडली, परंतु सोशल मीडियावर “कार्यालय की तमाशाचा फड?” अशा उपहासपूर्ण प्रतिक्रिया उमटत आहेत.

