(संगमेश्वर / एजाज पटेल)
कोंड्ये ग्रामपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी 18 मे रोजी दिमाखात पार पडला.
सतत प्रगतीपथावर असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कोंड्ये गावासाठी हा दिवस अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख होण्यासाठी कोंड्ये ग्रामपंचायतीची नवीन प्रशासकीय इमारत ग्रामस्थांच्या सेवेसाठी नक्कीच उत्तम कामं करील, असा विश्वास ना. उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.
ही नवीन इमारत केवळ एक वास्तू नसून कोंड्ये गावाच्या प्रगतीची, पारदर्शक प्रशासनाची आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी कामं करणारी वास्तू ठरणार आहे, असा विश्वास देखील ना. उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. गावाच्या विकासाची दिशा ठरवणारा एक नवीन अध्याय या इमारतीमधून लिहिला जाईल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या नवीन इमारतीमुळे ग्रामपंचायतीचे कामकाज अधिक जलद, कार्यक्षम आणि पारदर्शक होईल, अशी खात्री असून ग्रामस्थांसाठी अधिक चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावातील अनेक मान्यवर, नागरिक, अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील विविध क्षेत्रातील नागरिक, ज्येष्ठ मंडळी, युवक आणि महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून ग्रामपंचायतीच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.

