(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भारत सरकारच्या स्वच्छ हरित विद्यालय उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, भोके आंबेकरवाडी शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि हरित उपक्रमांचा समन्वय साधत या शाळेने शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सामाजिक जबाबदारीचे भान जपले असल्याचे या यशातून अधोरेखित झाले आहे.
शाळा परिसरातील स्वच्छता, वृक्षारोपण, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा विलगीकरण, पाण्याचा काटेकोर वापर तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती या सर्व निकषांवर शाळेने भरीव कामगिरी केली. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे शाळा केवळ शिक्षणाचे केंद्र न राहता पर्यावरणपूरक संस्कारांचे प्रेरणास्थान बनली आहे.
या यशामागे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थांचे योगदान मोलाचे ठरले. सामूहिक प्रयत्न, शिस्तबद्ध नियोजन आणि सातत्यपूर्ण उपक्रमांमुळे शाळेने तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. स्वच्छतेतून समृद्ध भविष्याचा संदेश देणाऱ्या या यशाबद्दल शाळेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

