(रत्नागिरी)
जिल्ह्यात यापूर्वी आलेल्या पूरस्थिती, वादळे आणि भूस्खलनाच्या घटना लक्षात घेता सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परस्पर समन्वयाने काम करावे. कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हा मान्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, सभापती महेश नाटेकर, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे मान्सूनपूर्व तयारीची माहिती दिली.
यावेळी पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले की, जिल्ह्यातील नदीकाठच्या वस्त्यांमध्ये विशेष सतर्कता बाळगावी. घाट परिसरात दरड कोसळून अपघात होणार नाहीत, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. संभाव्य आपत्तीच्या ठिकाणी यंत्रणा सज्ज ठेवून तातडीने मदतकार्य सुरू करता येईल, याची खबरदारी घ्यावी.
मंडणगड येथील राज्य महामार्गाची संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत. तसेच पावसाळ्यात एसटी बसेस गावागावात सुरळीत पोहोचतील, यासाठी रस्त्यांची स्थिती सुधारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
आरोग्य विभागाचा औषधसाठा, रुग्णवाहिका सेवा आणि ग्रामीण रुग्णालयांची तयारी याचाही आढावा घेण्यात आला. पावसाळ्यात साथीचे रोग फैलावू नयेत, यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. महावितरण विभागानेही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे सांगण्यात आले.
रेल्वे मार्गांवर ज्या ठिकाणी वारंवार भूस्खलन होते, त्या ठिकाणी विशेष सतर्कता बाळगण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तहसीलदारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील दरडप्रवण, भूस्खलन आणि पूरग्रस्त ठिकाणांना भेट देऊन दोन दिवसांत सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश पालकमंत्री डॉ. सामंत यांनी दिले.
बैठकीत महसूल, महावितरण, रेल्वे, बंदर विभाग, मेरीटाईम बोर्ड, पतन विभाग आणि आरोग्य विभागाच्या मान्सूनपूर्व तयारीचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.

