(रत्नागिरी / प्रतिनिधी)
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रत्नदुर्ग किल्ला परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरोधात शहर पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला असून, शुक्रवारी सायंकाळी टाकलेल्या अचानक छाप्यात चौघांना ताब्यात घेण्यात आले. पर्यटक व स्थानिकांच्या तक्रारींची दखल घेत ही कारवाई करण्यात आली असून, अशा मोहिमा यापुढे नियमित राबविण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून किल्ले रत्नदुर्ग तसेच भगवती बंदर पेठ परिसरात सायंकाळी मद्यपींचा वाढता वावर लक्षात येत होता. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालण्याच्या प्रकारांमुळे सहलीसाठी येणाऱ्या कुटुंबियांना व पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत परिसरात अचानक छापा टाकला. या मोहिमेदरम्यान काही तरुण सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत धिंगाणा घालताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे परिसरात शिस्तीचे वातावरण निर्माण होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक तानाजी पवार, परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक सिद्धी सावंत, उपनिरीक्षक सागर वाळुंजकर, हेडकॉन्स्टेबल पंकज पडेलकर, प्रवीण पाटील, कुशल हातिसकर आणि रोहन गमरे यांच्या पथकाने पार पाडली आहे.

