(नवी दिल्ली)
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून हरियाणाच्या ट्रॅव्हल व्लॉगर ज्योती मल्होत्रा हिला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या अटकेनंतर, ओडिशाच्या पुरी शहरातील युट्युबर प्रियंका सेनापती हिचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. ज्योतीच्या सोशल मीडियावरील प्रभावाचा वापर करून पाकिस्तानी गुप्तचर संस्थांनी भारतविरोधी कारवायांसाठी तिला वापरल्याचा गंभीर आरोप आहे.
पुरीतील डीएसपी आणि त्यांच्या पथकाने प्रियंका सेनापतीच्या घरावर छापे टाकले असून, तिच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे. तिच्या आणि ज्योतीमधील मैत्री सर्वत्र प्रसिद्ध असून सोशल मीडियावर त्यांच्या अनेक फोटो व व्हिडिओ व्हायरल होत आहेत. प्रियंकाच्या वडिलांनी देखील या मैत्रीची कबुली दिली असून, “तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करू,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रियंका सेनापतीने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, “मी नेहमी देशाला प्राधान्य दिलं आहे. ज्योतीवर झालेले आरोप धक्कादायक आहेत, मात्र मी कोणत्याही देशविरोधी कृतीत सहभागी नाही.”
कोण आहे ज्योती मल्होत्रा?
30 वर्षीय ज्योती मल्होत्रा ही हरियाणातील हिसारची रहिवासी आहे. पोस्ट-ग्रॅज्युएट शिक्षण घेतलेल्या ज्योतीची नोकरी कोरोना काळात, तिने ‘Travel With Jo’ हे युट्युब चॅनल सुरू केलं. तिच्या चॅनलला सध्या 3.77 लाख सबस्क्रायबर्स असून, इंस्टाग्रामवर 1.5 लाख फॉलोअर्स आहेत. तिने आतापर्यंत 500 हून अधिक ट्रॅव्हल व्हिडिओ तयार केले आहेत.
काय आहेत आरोप?
केंद्रीय गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीवरून, हरियाणा पोलिसांनी ज्योतीला अटक केली आहे. तिच्यावर Official Secrets Act, 1923 आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 2023 मध्ये तिने कमिशनमार्फत पाकिस्तानचा व्हिसा मिळवून दिल्लीत पाक उच्चायुक्तालयातील दानिश उर्फ एहसान-उर-रहीम या एजंटशी संपर्क साधला. त्यानंतर तिला पाक गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांशी भेट घडवून दिली गेली. तिने व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅटद्वारे संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचे समोर आले आहे. तसेच ती सोशल मीडियावरून पाकिस्तानच्या बाजूने सकारात्मक माहिती शेअर करायची, अशी माहितीही तपासात उघड झाली आहे.
विदेश दौराही केला, पाकिस्तानात तीन वेळा दौरे
ज्योतीने एका पाकिस्तानी एजंटच्या प्रेमात पडून इंडोनेशियाच्या बाली बेटावरही दौरा केला होता. गेल्या तीन वर्षांत तिने तीन वेळा पाकिस्तानला भेट दिली असून, त्या दौऱ्यांचा संपूर्ण खर्च पाकमधील व्यक्तीने केल्याचे समोर आले आहे. तिच्या ट्रॅव्हल व्लॉगमध्ये अटारी-वाघा सीमेवरून प्रवेश, लाहोरमधील अनारकली बाजार, बसमधील प्रवास, तसेच कटास राज मंदिराच्या भेटीचे व्हिडिओ आहेत. तिच्या एका इंस्टाग्राम फोटोवर उर्दूमध्ये “इश्क लाहोर” असं कॅप्शन आहे. तिने गेल्या वर्षी काश्मीरलाही भेट दिली होती. यामध्ये ती शिकारा राईड, श्रीनगर ते बनिहाल रेल्वे प्रवास, व विविध पर्यटनस्थळांची माहिती देताना दिसते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तिने “पुन्हा काश्मीरला जावं का?” अशी शंका सोशल मीडियावर व्यक्त केली होती, ज्यामुळे तिच्या हेतूंवर अधिक संशय निर्माण झाला आहे.
ज्योती मल्होत्रा हिच्या अटकेने देशांतर्गत सोशल मीडिया प्रभावकांच्या गुप्तचर नेटवर्कशी असलेल्या संभाव्य संबंधांचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. प्रियंका सेनापतीप्रमाणेच अनेकांचे सोशल मीडिया संबंध तपासाअंतर्गत तपासले जात आहेत. प्रकरण अधिक गंभीर असून, तपास यंत्रणांकडून पुढील कारवाईची प्रतीक्षा आहे.
देशाच्या सुरक्षेशी संबंधित कोणतीही माहिती सोशल मीडिया किंवा इतर सार्वजनिक माध्यमांवर शेअर करताना अत्यंत जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. प्रभावशाली लोकांनी त्यांच्या प्रत्येक कृतीचा समाजावर होणारा परिणाम ओळखून वागणं आज काळाची गरज बनली आहे.