(मुंबई / वार्ताहर)
मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘लेक लाडकी’ योजनेची अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. आता लाभार्थी मुलींच्या पालकांना ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे थेट ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्याही कमी करण्यात येणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
जुन्या पात्र लाभार्थ्यांना १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत अर्जाची संधी
१ एप्रिल २०२३ पासून पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांनाही योजनेचा लाभ मिळावा, यासाठी १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर पोर्टलवर नोंदणी होणाऱ्या नवीन प्रकरणांसाठी मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक राहणार आहे.
नवीन सुलभ प्रक्रियेत आधार क्रमांकाच्या आधारे आवश्यक माहिती ऑटो फेच केली जाणार आहे. तसेच लाभार्थी मुलगी, तिची माता आणि पिता यांची ई-केवायसी करण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांना वारंवार कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही.
पुढील लाभांसाठी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही
योजनेतील पुढील टप्प्यांतील लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना पुन्हा स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. संलग्न बँक खात्यात लाभाची रक्कम थेट डीबीटीद्वारे जमा केली जाणार असल्याने बँक खात्याची स्वतंत्र माहिती देण्याचीही गरज भासणार नाही. तसेच, अंगणवाडी केंद्राशी संबंधित माहितीही अर्जदारांना स्वतंत्रपणे भरावी लागणार नाही.
मुलीला मिळणार एकूण १ लाख १ हजार रुपयांचा लाभ
‘लेक लाडकी’ योजना महिला व बालविकास विभागामार्फत मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, त्यांचे सक्षमीकरण करणे आणि समाजात मुलींबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे.
१ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या पात्र मुलींना या योजनेअंतर्गत विविध टप्प्यांवर आर्थिक मदत दिली जाते.
| टप्पा | आर्थिक लाभ |
|---|---|
| मुलीच्या जन्मानंतर | ₹५,००० |
| इयत्ता पहिलीत प्रवेश | ₹६,००० |
| इयत्ता सहावीत प्रवेश | ₹७,००० |
| इयत्ता अकरावीत प्रवेश | ₹८,००० |
| मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर | ₹७५,००० |
| एकूण लाभ | ₹१,०१,००० |
योजनेचा लाभ मिळण्यासाठी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे तसेच शासनाने निश्चित केलेल्या उत्पन्न आणि इतर पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
अधिकाधिक पात्र मुलींना लाभ मिळण्याची अपेक्षा
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आणि अधिक सुलभ केल्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांना होणारी कागदपत्रांची धावपळ कमी होणार आहे. तसेच प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि लाभार्थीकेंद्रित होऊन अधिकाधिक पात्र मुलींना ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ मिळण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

