(मुंबई)
दहिसर पश्चिमेकडील गणपत पाटील नगर येथे दोन कुटुंबांमधील जुन्या वादाने भयावह वळण घेतलं. एक धक्कादायक घटनेत तिहेरी हत्याकांड घडले असून, एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि. 18 मे) दुपारी साडेचारच्या सुमारास झालेल्या या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
एमएचबी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राम नवल गुप्ता आणि हमीद शेख यांच्यात 2022 पासून वाद सुरू होता, जो पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला होता आणि दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल झाले होते. रविवारी दुपारी दारूच्या नशेत हमीद शेख गुप्तांच्या नारळ विक्रीच्या दुकानात पोहोचले आणि वाद सुरू झाला. यावेळी दोघांनीही आपापल्या मुलांना बोलावून घेतलं.
-
राम नवल गुप्ता यांनी त्यांचे तीन मुलगे – अमर, अमित आणि अरविंद यांना बोलावलं.
-
तर हमीद शेख यांनी त्यांचे दोन मुलगे – अरमान आणि हसन यांना पाचारण केलं.
यानंतर दोन्ही गटांत कोयता, चाकू आणि इतर धारदार शस्त्रांनी तुफान मारामारी झाली.
तिघांचा जागीच मृत्यू, चौघे गंभीर जखमी
या हाणामारीत राम नवल गुप्ता, अरविंद गुप्ता, आणि हमीद शेख यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमर गुप्ता, अमित गुप्ता, अरमान शेख, आणि हसन शेख हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, एमएचबी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून, शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत. दोन्ही कुटुंबातील सदस्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण दहिसर परिसर हादरून गेला असून, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेचे उपाय वाढवण्यात आले आहेत.

