(मुंबई)
जेव्हा मोबाईल फोन वाजतो आणि कॉल अज्ञात नंबरवरून येतो, तेव्हा बहुतांश लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, हा कॉल कुणाचा? फेक कॉल आहे की सायबर फ्रॉड? वाढत्या ऑनलाइन फसवणुकीमुळे अनेक जण असे कॉल उचलण्याचे टाळतात. मात्र, आता ही अडचण लवकरच संपणार आहे.
सायबर फ्रॉड आणि फेक कॉल्सवर आळा घालण्यासाठी भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी मोठे पाऊल उचलले आहे. देशातील आघाडीच्या खाजगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया (Vi) यांनी अनेक भागांमध्ये Caller Name Presentation (CNAP) सेवा सुरू केली आहे.
या नव्या सेवेमुळे, फोन वाजताच कॉल करणाऱ्या व्यक्तीचे खरे आणि नोंदणीकृत नाव थेट मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. हे नाव सिम कार्डच्या KYC कागदपत्रांमध्ये नोंदवलेल्या माहितीनुसार दाखवले जाईल. त्यामुळे अज्ञात नंबर ओळखणे अधिक सोपे होणार आहे.
आतापर्यंत कॉलरचे नाव जाणून घेण्यासाठी युजर्सना Truecaller सारख्या थर्ड पार्टी अॅप्सवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या निर्देशानंतर टेलिकॉम कंपन्यांनी थेट नेटवर्क-आधारित कॉलर नेम डिस्प्ले सेवा सुरू केली आहे.
ही सेवा डिफॉल्ट स्वरूपात सुरू राहणार असून, जर एखाद्या युजरला हे फीचर वापरायचे नसेल, तर ते डिअॅक्टिव्हेट करता येईल. टेलिकॉम कंपन्यांनी गेल्या वर्षी मुंबई आणि हरियाणा येथे या सेवेची यशस्वी चाचणी केली आहे.
TRAI आणि दूरसंचार विभागाच्या या निर्णयामुळे फेक कॉल्स, स्कॅम कॉल्स आणि सायबर गुन्ह्यांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता कॉल स्वीकारण्यापूर्वीच युजर्सना समजेल की कॉल ओळखीच्या व्यक्तीकडून आहे की अज्ञात नंबरवरून येत आहे.
या सुविधेमुळे नागरिक हॅकर्स आणि ऑनलाइन स्कॅमर्सपासून अधिक सुरक्षित राहतील आणि मोबाईल वापर अधिक विश्वासार्ह ठरणार आहे.

