( संगमेश्वर / प्रतिनिधी )
तालुक्यात कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात (पूर्वीचे न्यू इंग्लिश स्कूल, कडवई) इयत्ता दहावी १९८०-८१ च्या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल ४४ वर्षांनी पुन्हा एकदा शाळेच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र आले. या भावनिक स्नेहमेळाव्याचे आयोजन विशेष उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. शिक्षण विस्तार अधिकारी पदावरून निवृत्त झालेल्या सुवर्णा ब्रीद यांनी सरस्वती वंदना सादर केली आणि प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका मांडली. यावेळी आजी-माजी शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या शिक्षणकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत यळगुडकर यांनी “एकत्र येण्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते. गेट टुगेदरसाठी सर्वांनी यायलाच हवे असा हट्ट न धरता, जे शक्य तेवढे भेटावं, कारण पुढचं आयुष्य हे बोनस आहे, त्याचा आनंद घ्या,” असे विचार मांडले. पवार सर आणि योगिता पेंडसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात शाळेचे माजी मुख्याध्यापक लालासाहेब काळे यांच्या कन्या डॉ. नीता काळे यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना अनेकांना डोळे पाणावले. मुंबईत उपायुक्त पदावरून निवृत्त झालेल्या संगम पवार यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाची कथा कथन केली. प्रा. शिगवण, प्रा. विजय तुरळकर, कमल चिले, भारती सुर्वे यांनी आपल्या शाळेवरील प्रेम व्यक्त केले. गणेश सुर्वे यांनी शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा गौरव केला.
या भेटीच्या निमित्ताने २९ माजी विद्यार्थी उपस्थित होते. त्यांनी शाळेला सुंदर नामफलक व आर्चरी खेळासाठीचे साहित्य भेट देत सुमारे एक लाख रुपयांचे योगदान दिले. या योगदानाबद्दल मुख्याध्यापक शेषेराव अवघडे यांनी त्यांचे आभार मानले. दुपारी स्नेहभोजनानंतर मनोरंजनात्मक खेळ व फनी गेम्स आयोजित करून दिवसाचा समारोप उत्साहात करण्यात आला. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन निलेश कुंभार यांनी केले.
या आयोजनासाठी राजन शिंदे, विजय तुरळकर, हेमंत रेडीज, सुरेश बाईत गुरुजी, राजाराम ओकटे, मनोहर भारती, सुजाता मोहिते, श्रीराम कानाल, गणेश सुर्वे, रमेश यलगुडकर, रंजना तुरळकर, राजाराम जोगळे, प्रभाकर मांजरेकर यांनी विशेष मेहनत घेतली. एकत्र आलेली ही जुनी मैत्री आणि आठवणींचा अमोल ठेवा, सहभागी सर्वांच्या आयुष्यात आनंदाचा नवा अध्याय लिहून गेल्याची अनुभूती सर्वांनाच झाली.