(संगमेश्वर / एजाज पटेल)
कोल्हापूर–रत्नागिरी मार्गावर शाहूवाडी तालुका हद्दीत शुक्रवारी (दि. २० फेब्रुवारी) दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कसबा (ता. संगमेश्वर) येथील गजेंद्र शिवाजी देशमुख (वय ४४) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संगमेश्वर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गजेंद्र देशमुख हे कोल्हापूर येथे किराणा मालाची खरेदी करून आपल्या दुचाकीवरून (एमएच ०८ बीए ९००५) कसबा येथे परतत होते. त्याचवेळी शाहूवाडी तालुक्यातील वालूर गावच्या हद्दीत कचरे यांच्या बागेजवळ समोरून येणाऱ्या सुझुकी सुपर कॅरी (एमएच ०९ एफएल ९५०१) या वाहनाने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी तीव्र होती की गजेंद्र देशमुख गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी मृताचे वडील शिवाजी देशमुख यांनी शाहूवाडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा क्रमांक ४६/२०२५ नोंदविण्यात आला असून भारतीय दंड संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ)(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत वाहन चालक तुकाराम शंकर माने (रा. वालूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मुल्लानी करीत आहेत.

