(खेड)
मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे परिसरात सोमवारी रात्री एक हृदयद्रावक अपघात घडला. रस्त्याने पायी जात असलेल्या प्रवीण पांडुरंग साळवी (वय ४७, रा. हनुमाननगर, गुणदे – खेड) यांना पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना रात्री सुमारे १०.२५ च्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार नीरज ईश्वरदिन वर्मा (वय २९) हा देखील गंभीर जखमी झाला आहे.
प्रवीण साळवी हे लोटे येथील एच.पी. पेट्रोलपंप ते लोटेमाळकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडने पायी जात होते. दरम्यान, एम.एच.०८/ए.झेड.८७६० क्रमांकाची दुचाकी चालवत असलेला नीरज वर्मा हा भरधाव वेगाने येत होता. रस्त्याच्या परिस्थितीची पूर्णपणे अवहेलना करत वर्माने निष्काळजीपणे दुचाकी चालवत साळवी यांना पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन त्यांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच चिपळूण वाहतूक पोलीस मदतकेंद्राचे पोलीस उपनिरीक्षक अनंत पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामपूरकर, पोलीस कॉन्स्टेबल राठोड, नार्वेकर, निवडुंगे तसेच लोटे पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी दुचाकीस्वारास तातडीने लवेल येथील घरडा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या अपघाताप्रकरणी नीरज वर्मा याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण साळवी हे लोटे येथील पेट्रोलपंपावर कारमध्ये सीएनजी भरण्यासाठी गेले होते. मात्र सीएनजीचा तुटवडा असल्यामुळे त्यांनी कार तिथेच उभी करून जवळच्या टपरीवर काही कामासाठी गेले होते. परत येत असताना त्यांना दुचाकीची जोरदार धडक बसली. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली असून, मंगळवारी दुपारी ३ वाजता त्यांच्यावर शोकमग्न वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रवीण साळवी यांच्या पश्चात वृद्ध माता-पिता, पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी व दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. कुटुंबाच्या आधारस्तंभावरच नियतीने झडप घातल्याने साळवी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.