(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील सोनवी नदीपात्रात कोणतीही सुरक्षा व्यवस्था न करता थेट विद्युत वाहिनीसह नवीन उभारण्यात आलेल्या पुलावरून पंप सोडण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाच्या कामासाठी पाणी उपसण्यासाठी संबंधित ठेकेदाराने हा जीवघेणा प्रकार केला असून, नदीपात्रात तहान भागवण्यासाठी उतरणाऱ्या प्रत्येक सजीवाच्या जीवाशी उघड खेळ सुरू असल्याचा संतप्त आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
नदी पात्राच्या पाण्यात सोडण्यात आलेल्या विद्युत वाहिनीत क्षणभर जरी दोष निर्माण झाला, तरी संपूर्ण नदीपात्रात विद्युत प्रवाह पसरून जलचर प्राणी, मासे, पाणी पिण्यासाठी येणारी शेतकऱ्यांची जनावरे तसेच वन्यप्राणी यांचा तात्काळ मृत्यू होऊ शकतो. शासनाने नदीत लहान मासेमारीवर स्पष्ट बंदी घातलेली असताना, पाण्यात थेट विद्युत उपकरण टाकणे हे कायद्याची पायमल्ली नव्हे तर थेट गुन्हा असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
ठेकेदाराचा मनमानी, बेजबाबदार कारभार दिवसेंदिवस बळावत चालला असून, यामुळे परिसरातील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. नियम, अटी, पर्यावरणीय परवानग्या, सुरक्षितता मानके सर्व काही धाब्यावर बसवून काम सुरू असल्याचा आरोप होत आहे. एवढेच नव्हे तर संभाव्य जीवितहानीकडे दुर्लक्ष करून “काहीही झाले तरी चालेल” या वृत्तीने काम रेटले जात असल्याचा रोष ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. या अत्यंत गंभीर आणि धोकादायक प्रकाराकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोपही आता तीव्र होत आहे.
वारंवार तक्रारीची बोंबाबोंब करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने प्राधिकरणाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.
जर या पंपामुळे एखादी दुर्घटना घडली, तर त्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी कोण घेणार? एखाद्या जनावराचा किंवा वन्यप्राण्याचा मृत्यू झाला, अथवा माणसाच्या जीवाला धोका पोहोचला, तर प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करून सोनवी नदीपात्रातून विद्युत पंप तात्काळ हटवावा, तसेच महामार्ग प्राधिकरणाने याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

