(देवरूख)
संगमेश्वर-देवरुख-साखरपा हा राज्य महामार्ग निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहतुकीस अयोग्य झाल्याच्या निषेधार्थ शिवसेना (ठाकरे गट) आणि महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने आज साडवली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
माजी खासदार विनायक राऊत यांनी या प्रसंगी ठेकेदारावर जोरदार निशाणा साधला. “रस्त्याची पाच वर्षांची गॅरंटी असतानाही काही वर्षांतच दुर्दशा झाली आहे. ठेकेदाराने उघडपणे निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. ऑक्टोबरनंतर हा रस्ता कसा दुरुस्त केला जाणार याचे लेखी उत्तर आम्हाला हवे,” अशी मागणी त्यांनी केली.
माजी राज्यमंत्री रविंद्र माने यांनीही ठेकेदारावर कारवाईची मागणी करताना प्रश्न उपस्थित केला – “या कामासाठी किती निधी खर्च झाला आणि किती ठेकेदाराच्या खिशात गेला याचा हिशोब द्यावा.”
आंदोलनात सहभागी नेत्यांनीही प्रशासनाला इशारा दिला की, जनतेचा उद्रेक होण्यापूर्वी रस्त्याचे पुनर्निर्माण तातडीने हाती घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.

