(संगमेश्वर)
तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गालगत वसलेले साखरपा बसस्थानक हे व्यापारी दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. या बसस्थानकाची हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत रायगड विभागाच्या विभागीय वाहतूक अधीक्षक मनीषा पाटील यांनी नुकतीच पाहणी केली.
या पाहणीवेळी स्वच्छतागृहांची स्थिती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता व संपूर्ण परिसराचे निरीक्षण करण्यात आले. बसस्थानक आवारातील अनधिकृत बॅनरमुळे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत असल्याची बाब अधीक्षकांच्या निदर्शनास आली. यावर तातडीने कार्यवाही करत, “पे अँड पार्किंग” व्यवस्थेचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
बसस्थानकातील गतीमान प्रवासी हालचाली लक्षात घेता, येत्या काळात येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, प्रवाशांसाठी आकर्षक सेल्फी पॉइंटची देखील व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या पाहणी दौऱ्यात मनीषा पाटील यांच्यासोबत विभागीय अधिकारी सुहास कांबळे व त्यांच्या टीमसह गणेश वायदंडे (वर्कशॉप अधीक्षक, राऊळ मलुष्टे), सलीम साठविलकर (वाहतूक नियंत्रक), सचिन शेजवळ (देवरुख), विलास शेळके (साखरपा), व प्रवासी मित्र मंडळी मान्यवर उपस्थित होते.

