( संगमेश्वर / प्रतिनिधी )
नवनिर्मिती फाउंडेशन, समता फाउंडेशन, ग्रामपंचायत कुरधुंडा आणि जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने कुरधुंडा येथे आयोजित मोफत नेत्रतपासणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिबिरात दृष्टीदोष, विविध नेत्ररोग तसेच मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. अनेक नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला. मोतीबिंदू निदान झालेल्या नागरिकांची शस्त्रक्रिया संस्थेच्या वतीने पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामपंचायत सरपंच सौ. नाझिमा बांगी यांनी केली.
कार्यक्रमाला नवनिर्मिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रमजान गोलंदाज, कार्याध्यक्ष जमुरत अलजी, सरपंच नाझिमा बांगी, उपसरपंच तैमूर अलजी, तंटामुक्ती अध्यक्ष इरफान नवरेकर, नेत्रतज्ज्ञ डॉ. संकेत पाटील यांसह समता फाउंडेशनचे नितेश शेटे, ग्रामपंचायत सदस्य संगीता लिंगायत, ग्रामसेवक श्रेया भायजे, संदेश निघावले, सुधीर खापरे, दिप्ती डावल, उमर अलजी, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते तसेच आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. स्थानिक नागरिकांनी शिबिराचे आयोजन केल्याबद्दल सर्व आयोजक संस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.

