( संगमेश्वर/ प्रतिनिधी )
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने तालुक्यातील भातशेतीस मोठा फटका बसला आहे. गणपती उत्सवानंतर वातावरणात उघडीप दिसू लागल्याने भातकापणीची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली होती. मात्र, पुन्हा सुरू झालेल्या संततधारांनी ही सर्व तयारी अक्षरशः पाण्यात गेली आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे, नाले पात्रभर वाहू लागले आहेत. परिणामी, तयार भातशेतीत पाणी साचून कापणीची कामे ठप्प झाली आहेत. शेतात पाणी तुंबल्याने भात वाळवण्यासही उघडीप मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. यातच रात्रीच्या वेळी डुक्करांच्या संख्येत वाढ होऊन, त्यांनी भाताच्या लोंबींचे नुकसान केल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. भातशेतीवर लोळून, लोंबी खाऊन डुक्कर शेती जमीनदोस्त करीत आहेत. डोंगराळ परिसरात असलेल्या संगमेश्वर तालुक्यात या नुकसानीचे प्रमाण अधिक असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हळव्या जातीचा भात कापणीसाठी तयार असून, अजून काही दिवस पावसाचा जोर कायम राहिला तर उशिरा येणाऱ्या ‘महान’ जातीच्या भातशेतीलाही फटका बसण्याची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे कापणीअभावी तांदळाची गुणवत्ता कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकरी वर्गाने शासनाकडे तातडीने पंचनामे करून मदतीची मागणी केली आहे.

