(ठाणे)
फिलिपिन्समध्ये पर्यटनासाठी गेलेल्या वसईतील एका दाम्पत्याचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परदेशात सहलीला गेलेल्या जेराल्ड परेरा (५०) आणि प्रिया परेरा (४६) या दाम्पत्याच्या अपघाती निधनाने वसई परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसई पूर्वेतील सांडोर येथील रहिवासी असलेले परेरा दाम्पत्य १० मे २०२५ रोजी फिलिपिन्समधील बाडियान या पर्यटनस्थळी गेले होते. पर्यटनासाठी बाहेर पडलेले हे दाम्पत्य दुचाकीवरून प्रवास करत असताना एका टोयोटा हिलक्स ट्रकने धडक दिली. ट्रक चालवत असलेली एक स्थानिक महिला धोकादायक ओव्हरटेक करत असताना वाहनावरील नियंत्रण गमावले आणि तिच्या निष्काळजीपणामुळे ही भीषण दुर्घटना घडली.

या धडकेमुळे परेरा दाम्पत्याची दुचाकी जवळच्याच सिमेंटच्या विजेच्या खांबाला आदळली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये परेरा दाम्पत्य कार आणि खांबाच्या मधोमध अडकल्याचे आणि गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे दिसत आहे. अपघातानंतर तातडीची वैद्यकीय मदत मिळाली असती, तर त्यांचा जीव वाचण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.
प्रिया परेरा यांचा मृत्यू रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच झाला, तर जेराल्ड परेरा यांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला. विशेष म्हणजे, अपघात घडवणाऱ्या महिलेने याच घटनेत आणखी दोन दुचाकींनाही धडक दिली होती. स्थानिक पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध कारवाई करत तिला अटक केली आहे.
परेरा दाम्पत्याच्या पश्चात २० वर्षीय मुलगा तनिष आणि १७ वर्षांची मुलगी त्रिशा, तसेच वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. जेराल्ड परेरा हे जहाजावर (शीपवर) काम करत होते, तर प्रिया परेरा या मुंबईतील एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. या दाम्पत्याच्या अचानक निधनाने वसईकरांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत असून परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचा मृतदेह उद्या मुंबईत आणण्यात येणार असून त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

