(रत्नागिरी / रायगड)
इतिहासाच्या पाऊलखुणा केवळ पुस्तकांतून जाणून घेण्याऐवजी त्यांचा प्रत्यक्ष मागोवा घेत प्राचीन बुद्ध लेणी, शिल्पकला आणि सातवाहनकालीन धम्मलिपीचा अभ्यास करण्याचा उपक्रम रायगड जिल्ह्यातील तळा येथील ऐतिहासिक कुडालेणी येथे पार पडला. दान पारमिता फाउंडेशनच्या वतीने ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या अभ्यास कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी प्राचीन धम्मलिपीतील शिलालेखांचे प्रत्यक्ष वाचन केले. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या विद्यार्थी, अभ्यासक आणि धम्मप्रेमींसाठी हा उपक्रम इतिहास, भाषा आणि बौद्ध संस्कृतीचा अनोखा अनुभव ठरला.
कुडालेणी येथील बुद्ध लेण्यांचा इतिहास, त्यांची निर्मिती, स्थापत्यशैली, प्राचीन शिल्पकला तसेच लेण्यांच्या प्रवेशद्वारांबाहेर कोरलेल्या सातवाहनकालीन धम्मलिपीतील शिलालेखांचा या कार्यशाळेत सविस्तर अभ्यास करण्यात आला. प्राचीन लिपीची ओळख करून घेत विद्यार्थ्यांनी शिलालेखांचे प्रत्यक्ष वाचन केले. त्यामुळे ऐतिहासिक साधनांचा अभ्यास केवळ सैद्धांतिक पातळीवर न राहता प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेण्याची संधी त्यांना मिळाली. दान पारमिता फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक सुनील खरे, संतोष अंभोरे, रूपाली गायकवाड आणि विकास शिंदे यांनी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक रूपाली गायकवाड यांनी केले. या ऐतिहासिक स्थळी एकत्र येण्यामागील उद्देश स्पष्ट करताना त्यांनी लेणी संवर्धन, ऐतिहासिक वारशाचे जतन आणि धम्मपरंपरेचे संरक्षण यांचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात पुन्हा धम्माचा रथ गतिमान केला असून, तो पुढील पिढ्यांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाची ओळख करून घेणे आणि त्याचे जतन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. अशा ऐतिहासिक स्थळांना केवळ वैयक्तिक भेट न देता कुटुंबीयांसह भेट द्यावी, जेणेकरून नव्या पिढीलाही आपल्या पूर्वजांच्या सांस्कृतिक आणि धम्मपरंपरेची ओळख होईल, असे आवाहनही त्यांनी केले.
सुनील खरे यांनी बुद्ध लेण्यांचा इतिहास, त्यांची निर्मिती, प्राचीन भाषा, शिलालेखांचे ऐतिहासिक महत्त्व आणि धम्मलिपी वाचनाची पद्धत याविषयी सविस्तर विवेचन केले. एखादी लेणी केवळ पाहून तिचा इतिहास समजत नाही, तर तिच्यामागील भाषा, लिपी, शिल्पकला आणि तत्कालीन ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विकास शिंदे यांनी सातवाहनकालीन राजे, तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक परिस्थिती आणि बौद्ध धम्माच्या प्रसारातील त्यांचे योगदान याविषयी माहिती दिली.
या कार्यशाळेत रत्नागिरी, अमरावती, बारामती, नाशिक, मुंबई आणि सातारा आदी भागांतील विद्यार्थी, अभ्यासक आणि धम्मप्रेमींनी कुटुंबीयांसह सहभाग घेतला. रत्नागिरी जिल्ह्यातून पाली भाषा अभ्यासक प्रा. दिलीप वासनिक यांच्या नेतृत्वाखाली विजय जाधव, अनामिका जाधव, दीपिका वासनिक, संजय आयरे, सुप्रिया आयरे, सुहास कांबळे, तृप्ती कांबळे, तानाजी कांबळे, शुभांगी कांबळे, प्रकाश कांबळे, रजनी कांबळे, अशोक जाधव, अनिल जाधव, नंदादीप जाधव, मनोज गमरे, अतुल कांबळे, आदेश कांबळे आणि मृण्मयी गमरे यांनी सहभाग नोंदवला. आधुनिकतेच्या प्रवाहात वावरणारी तरुण पिढी आपल्या धम्माचा इतिहास, बुद्ध लेणी, प्राचीन शिलालेख आणि सांस्कृतिक वारसा जाणून घेण्यासाठी पुढाकार घेत आहे, ही समाधानाची बाब असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
ऐतिहासिक लेणी म्हणजे केवळ दगडात कोरलेल्या वास्तू नव्हेत, तर त्या तत्कालीन समाजाचे ज्ञान, कलात्मक कौशल्य, धम्मनिष्ठा आणि सांस्कृतिक समृद्धी यांची साक्ष देणारा अमूल्य ठेवा आहेत. पुस्तकांतून इतिहासाचे वाचन करण्याबरोबरच प्रत्यक्ष ऐतिहासिक स्थळांना भेट देणे, शिलालेखांचे वाचन करणे आणि त्यांचे महत्त्व समजून घेणे, यातून वारशाच्या संवर्धनाची जाणीव अधिक दृढ होते. कुडालेणी येथील या कार्यशाळेने पाली भाषा, धम्मलिपी, बौद्ध इतिहास आणि लेणी संवर्धनाच्या अभ्यासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला.


