(शिरपूर / प्रतिनिधी)
विश्वशांती आणि राष्ट्रहितासाठी लाखो माता भगिनींनी सामुदायिक स्वरूपात तप्त उन्हात भगवतीच्या चरणी रुजू केलेल्या भैरवचंडी सारख्या अतिउच्च सेवेमुळे संपूर्ण देशभरात शिरपूर नगरीचे सामर्थ्य आणि लौकिक निश्चितच वाढेल असा शुभाशीर्वाद अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री.आण्णासाहेब मोरे यांनी दिला तेव्हा लाखो सेवेकर्यांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट आणि स्वामीनामाचा जयघोष करून आसमंत दणाणून टाकला.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे श्री क्षेत्र करवंद (शिरपूर) येथे उत्तर महाराष्ट्र विभागीय महासत्संग सोहळ्यात गुरुमाऊली श्री. मोरे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शिरपूर नगरीत अनेक सिद्ध महात्म्यांच्या संजीवन समाधी आहेत. त्याशिवाय श्री क्षेत्र करवंद येथे आज एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना झाल्यामुळे भाविकांना सर्व ज्योतिर्लिंगांचे एकाच ठिकाणी दर्शन घेणे सुखावह होणार आहे. या क्षेत्री असलेल्या पुरातन आणि जागृत श्री नवनाथांच्या देवस्थानामुळे भक्तांचे संरक्षण होते. नगरीतल्या तापी नद्यांमुळे जनतेची तृष्णा भागते शिवाय विकासाच्या बाबतीत शिरपूर पॅटर्न राज्यात नव्हे तर देशात गाजला त्याच धर्तीवर आई भगवतीच्या आशीर्वादाने भैरव चंडीसारख्या अतिउच्च सेवेमुळे शिरपूर नगरीचे महत्त्व वाढेल असा आशीर्वाद गुरुमाऊली श्री. मोरे यांनी दिला तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.
परमपूज्य गुरुमाऊलींची मिष्ठान्न तुला..!
परमपूज्य गुरुमाऊली श्री. मोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा देश-विदेशातील विविध सेवाकेंद्रांकडून साजरा केला जात आहे. श्री क्षेत्र करवंद येथील महासत्संग सोहळ्यात शिरपूर सेवा केंद्रातर्फे परमपूज्य गुरुमाऊलींची मिष्ठान्न तुला करून अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि लाखो सेवेकर्यांनी गुरुमाऊली श्री. मोरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. याच कार्यक्रमात जळगाव मधील प्रतापनगर केंद्राने एक लाख अकरा हजार रुपयांची देणगी स्वामी कार्यासाठी सुपूर्द केली.
आदिवासी महिलांना साड्या वाटप..
गुरुमाऊली श्री मोरे यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त एक लाख आदिवासी महिलांना प्रसाद आणि साडी वाटप करण्यात येणार असून महासत्संगात प्रातिनिधिक स्वरूपात काही महिलांना गुरुमाऊली श्री. मोरे यांच्या हस्ते साड्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.
मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा…!
कार्यक्रमाला व्यासपीठावर माजी मंत्री अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्रभाई पाटील, माजी नगराध्यक्ष भूपेश पटेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, तुषार रंधे आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी परमपूज्य गुरुमाऊलींच्या सेवाभावी सामाजिक कार्याचा गौरव केला. सेवेकरी मुकुंद कुलकर्णी यांनी नेटके शब्दात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
महासत्संग मेळावा यशस्वी होण्यासाठी गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे आणि गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांनी कार्यक्रमपूर्व आढावा बैठका घेऊन सेवेकर्यांना नियोजनाबाबत मार्गदर्शन केले होते. महा सत्संग मेळाव्याला दीड लाखाहून अधिक सेवेकर्यांची उपस्थिती होती. तर भैरव चंडीच्या सर्वोच्च सेवेत एक लाखाहून अधिक महिला-भगिनी भर उन्हात अत्यंत श्रद्धेने सहभागी झाल्या होत्या. गुरुपीठातील याज्ञिकी टीमने भैरवचंडी सेवेचे पौरोहित्य केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि नीटनेटका झाला. सायंकाळी परमपूज्य गुरुमाऊली श्री. मोरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. एका उघड्या सजविलेल्या जीप मधून गुरुमाऊली श्री मोरे यांची व्यासपीठापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाला स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणेचे उत्तम सहकार्य लाभले. हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात पार पडला.