(मुंबई / वृत्तसंस्था)
दूध, पनीर आणि विविध खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधात कारवाई सुरू असतानाच आता अन्न व औषध प्रशासनाने (FDA) खाद्य तेलाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले आहे. ‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग, सेव्ह महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत खाद्य तेलाच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. खाद्य तेलाच्या निर्धारित मानकांचे उल्लंघन, भेसळ आणि अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंढे यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान नोंदणी नसलेल्या काही खाद्य तेल उत्पादक कंपन्या आढळून आल्या आहेत. तसेच खाद्य तेलात भेसळ करण्याचे प्रकारही निदर्शनास आले आहेत. विशेषतः मोहरी तेलामध्ये अनधिकृत मिश्रण केले जात असल्याचे आढळले असून, अशा प्रकाराला परवानगी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय मुदत संपलेल्या तेलाचे पुन्हा रिपॅकिंग करून विक्री करण्याचे प्रकारही समोर आल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
खाद्य तेलाच्या मानकांबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून ‘कम्प्लायन्स ऑर्डर’ काढण्यात येत असून, खाद्य तेलाच्या व्यवसायाशी संबंधित सर्व आस्थापनांना त्याचे पालन करावे लागणार आहे. उत्पादन, पॅकेजिंग, साठवणूक आणि विक्री करणारे उत्पादक, किराणा दुकानदार तसेच ऑनलाइन विक्रेते यांच्यावरही हे नियम लागू असतील. खाद्य तेलाशी संबंधित ४९६ केंद्रीय परवानाधारक आस्थापनांची नोंद असल्याची माहिती मुंढे यांनी दिली.
खाद्य तेलाची सुट्या स्वरूपात विक्री करता येत नाही, हा नियम आधीपासूनच लागू असल्याचे स्पष्ट करत मुंढे यांनी किरकोळ विक्रेत्यांनीही सुटे तेल खरेदी करू नये, असे आवाहन केले. ग्राहकांनीही पॅकबंद खाद्य तेलच खरेदी करावे. पॅकेट किंवा बाटलीवरील लेबल, सील आणि मुदतवाढीची तारीख तपासूनच तेल खरेदी करावे, असे त्यांनी सांगितले.
मोहरी तेलाबाबतही मुंढे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. मोहरी तेल १०० टक्के मोहरी तेल म्हणूनच विकावे लागेल. त्यामध्ये अनधिकृत मिश्रण करता येणार नाही. सुटे तेल मोठ्या प्रमाणावर विकले जात असून, ते नेमके कुठून आणि कधी आले, याचा मागोवा घेणे कठीण असते. त्यामुळे अशा तेलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
खाद्य तेलाच्या टिनचा पुन्हा वापर करण्याच्या प्रकारावरही अन्न व औषध प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. तसेच तळणीसाठी वापरलेले तेल वारंवार वापरण्याच्या पद्धतीवरही मुंढे यांनी आक्षेप घेतला. हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी एकाच तेलाचा वारंवार वापर केला जात असल्याचे आढळल्यास त्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. घरगुती वापरातही तळणीचे तेल वारंवार वापरू नये, असे आवाहन त्यांनी केले.
खाद्य तेलाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कायद्यानुसार कठोर शिक्षेची तरतूद असल्याचे मुंढे यांनी सांगितले. भेसळीच्या प्रकरणात १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असून, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठीही १० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये सात वर्षांपासून आजन्म कारावासापर्यंत शिक्षेची तरतूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘सुटे तेल खरेदी करू नका, पॅकबंद तेल घेताना लेबल आणि सील तपासा तसेच एक्सपायरी डेट पाहा,’ असे आवाहन मुंढे यांनी ग्राहकांना केले. खाद्य तेलातील भेसळीचा प्रश्न केवळ ग्राहकांची आर्थिक फसवणूक किंवा नियमांचे उल्लंघन यापुरता मर्यादित नसून, त्याचा आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले. भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाच्या तेलामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे खाद्य तेलाच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे खाद्य तेल उत्पादक, वितरक, किरकोळ विक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि ऑनलाइन विक्रेत्यांमध्येही आता नियमपालनाबाबत अधिक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

