(नवी दिल्ली)
भारत आणि पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तात्पुरते बंद करण्यात आलेले उत्तर आणि पश्चिम भारतातील ३२ विमानतळ आता तात्काळ प्रभावाने पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि इतर विमान वाहतूक नियामक संस्थांनी याबाबत अधिकृत अधिसूचना (NOTAM) जारी केली आहे.
यापूर्वी, भारताच्या सीमावर्ती भागात संभाव्य सुरक्षेच्या कारणामुळे ९ ते १५ मे २०२५ दरम्यान या विमानतळांवरील नागरी उड्डाण सेवा स्थगित करण्यात आली होती. मात्र, सध्याची परिस्थिती नियंत्रणात आल्याने ही स्थगिती हटविण्यात आली आहे आणि संबंधित विमानतळांवरील नागरी विमानसेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने आज (सोमवारी, १२ मे) एका निवेदनात स्पष्ट केले, “१५ मे २०२५ रोजी सकाळी ५:२९ पर्यंत नागरी उड्डाण सेवा स्थगित करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली होती. मात्र, सद्यस्थितीत ही स्थगिती रद्द करण्यात आली असून सर्व ३२ विमानतळ नागरी उड्डाणासाठी खुली करण्यात आली आहेत. प्रवाशांनी आपल्या विमानाच्या स्थितीची माहिती संबंधित विमान कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवरून घेण्याचे आवाहन करण्यात येते.”
पुन्हा सुरू करण्यात आलेली विमानतळे :
या यादीमध्ये खालील विमानतळांचा समावेश आहे:
आदमपूर, अंबाला, अमृतसर, अवंतीपोरा, बठिंडा, भुज, बीकानेर, चंदीगड, हलवारा, हिंडन, जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपूर, कांडला, कांगडा (गग्गल), केशोद, किशनगड, कुल्लू मनाली (भुंतर), लेह, लुधियाना, मुंद्रा, नालिया, पठानकोट, पटियाला, पोरबंदर, राजकोट (हीरासर), सरसावा, शिमला, श्रीनगर, थोईस आणि उत्तरलई.
प्रवाशांसाठी सूचना:
AAI विमानतळेकडून प्रवाशांना सूचित करण्यात आले आहे की, प्रवासाच्या आधी विमानाची स्थिती आणि वेळेचे अपडेट जाणून घेण्यासाठी संबंधित विमान कंपन्यांच्या वेबसाइट्सवर नियमितपणे भेट द्यावी.