( मुंबई )
राज्यातील सुमारे 86 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या थकीत हप्त्यांसाठी शासनाने तातडीने 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत थकीत हप्ता कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर 24 फेब्रुवारी रोजी काही कामगार संघटनांनी पुकारलेले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवासात अडथळा येऊ नये, याकडे लक्ष वेधत सरनाईक यांनी संघटनांना संयम राखण्याची विनंती केली होती. दरम्यान, मंगळावर (२४) पासून आझाद मैदानात होणारे “बोंब मारो” आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे. सद्या तात्पुरत्या स्वरूपात १०० कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली असून आझाद मैदान, मुंबई येथे होणारे “बोंब मारो” आंदोलन होणार नसल्याचे बरगे यांनी म्हटले आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी निधी उपलब्ध व्हावा यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले होते. तरीही राज्य सरकारच्या अर्थ खात्यात ही निधी मंजुरीसाठी टाळाटाळ करण्यात येत होती. वारंवार त्रुटी काढून निधी देण्यात खोडा घातला जात होता. पण आता अर्थ खात्याचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यांनी १०० कोटी रुपयांच निधी उपलब्ध करून देण्यात अनुकूलता दर्शविली असून पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील ८६००० कर्मचाऱ्यांना या महिन्याचा वेतनवाढ फरक रक्कम प्रलंबित हप्ता लवकरच मिळेल अशी अपेक्षा करीत निधी मंजुरी बद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार बरगे यांनी व्यक्त केले आहेत.
प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटी महामंडळाकडे वेतनवाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने ही जबाबदारी शासनाने घ्यावी, याबाबत एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर शासनाकडून दरमहा सुमारे 65 कोटी रुपये अनुदान स्वरूपात एसटी महामंडळाला देण्याचा निर्णय झाला.
डिसेंबर महिन्यापासून थकीत हप्ते वेतनासोबत देण्यास सुरुवात झाली होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारीच्या वेतनावेळी निधी उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आणि आंदोलनाची भूमिका घेतली गेली होती.
ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार शासनाने थकीत रकमेपोटी एकूण 210 कोटी रुपये देण्याचे मान्य केले असून, त्यातील 100 कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित निधीही लवकरच मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
थकीत वेतनाचे सर्व हप्ते कोणत्याही परिस्थितीत देण्यात येतील, असे स्पष्ट करत सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.

