(मुंबई)
एसटी महामंडळात लवकरच मोठ्या प्रमाणात नोकरभरती होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी येत्या काही वर्षांत २५ हजार स्वमालकीच्या बस खरेदी करण्यात येणार आहेत. या बस चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज भासणार असून, चालक, वाहक यांच्यासह विविध पदांची भरती प्रस्तावित आहे.
प्रस्तावित भरतीसाठी आवश्यक ठरावाला नुकतीच एसटी महामंडळाच्या ३०७ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. सदर ठराव शासनाच्या मंजुरीसाठी लवकरच पाठवण्यात येणार आहे.
मंत्री सरनाईक म्हणाले, “एसटी महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीमुळे उच्च न्यायालयाने २०२४ पर्यंत नोकरभरतीवर निर्बंध घातले होते. मात्र, लवकरच अनेक कर्मचारी निवृत्त होणार असल्याने व नव्या बसगाड्यांची संख्या वाढणार असल्यामुळे, नव्या पदभरतीची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी शासनाकडून मंजुरी घेतली जाणार आहे.”
अभियंते आणि तांत्रिक अधिकाऱ्यांचीही भरती
एसटीच्या विविध विभागांमध्ये सध्या कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. विशेषतः बांधकाम, देखभाल, तांत्रिक नियोजन यांसारख्या विभागांत अभियंत्यांची गरज मोठ्या प्रमाणावर भासत आहे. भविष्यात PPP (Public Private Partnership) तत्त्वावर एसटीच्या मालमत्तांचा विकास होणार असल्याने, त्यासाठी कुशल अभियंत्यांची आवश्यकता निर्माण होईल.
सध्या रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या जागा करार पद्धतीने तसेच सरळसेवा भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. यासाठी एसटीच्या प्रत्येक खात्यांनी आपापल्या विभागातील रिक्त पदांचा फेरआढावा घेऊन आवश्यक जागांची मागणी एकत्रितरित्या सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मंत्री सरनाईक यांनी पुढे सांगितले, “एसटीच्या सक्षमीकरणासाठी केवळ संख्याबळ नव्हे, तर तांत्रिकदृष्ट्याही सक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेचा आराखडा तयार करून तो टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे.”