(पुणे)
आयुष कोमकर खून प्रकरणात फरार असलेल्या आंदेकर टोळीतील चौघांना पोलिसांनी गुजरात सीमेवर अटक केली आहे. अटक केलेल्यांत माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर (६०), तसेच तिचे पुत्र शिवम (३१), शिवराज (२९) आणि अभिषेक (२१, सर्व रा. नाना पेठ) यांचा समावेश आहे. मात्र, टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा आंदेकर अद्याप फरार असून, गुन्हे शाखेची पथके त्याच्या मागावर आहेत. काल रात्री अटक केलेल्या चौघांना आज (सोमवार, १५ सप्टेंबर) पुण्यातील न्यायालयात हजर करणार आहेत.
प्रकरणाचा तपशील
५ सप्टेंबर रोजी विसर्जन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला नाना पेठेत टोळीयुद्ध उफाळून आले. हमाल तालमीजवळील सोसायटीत आयुष कोमकर (वय १७) लहान भावाला शिकवणीतून घेऊन घरी परतत असताना त्याच्यावर पिस्तुलातून बेछूट गोळीबार करण्यात आला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आयुषची आई कल्याणी (३७) हिने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा आंदेकर (७०), त्याचा नातू तुषार वाडेकर (२७), स्वराज वाडेकर (२३), मुलगी वृंदावनी वाडेकर (४०), तसेच अमन पठाण (२५), यश पाटील (१९), अमित पाटोळे (१९), सुजल मेरगु (२०) यांना आधीच अटक केली होती.
गुन्हे शाखेची कारवाई
बंडू आंदेकरचा पुतण्या शिवम, शिवराज, अभिषेक आणि लक्ष्मी आंदेकर हे गुजरातकडे पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना महाराष्ट्र–गुजरात सीमेवर सापळा रचून त्यांना अटक केली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीकर आणि शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
मकोका अंतर्गत कारवाई
या प्रकरणात बंडू आंदेकरसह एकूण १३ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी बंडू आंदेकर, त्याची मुलगी वृंदावनी, स्वराज, तुषार वाडेकर, तसेच अमन पठाण, यश पाटील यांच्या घरावर छापे टाकून ७७ तोळे सोन्याचे दागिने, अडीच लाखांची रोकड, जमीन व्यवहारातील कागदपत्रे, मोटार आणि करारनामे जप्त केले आहेत.

