(नवी मुंबई)
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून पसार होणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या टोळीला अखेर अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा कक्ष 03, पनवेलच्या पथकाने कारवाई करत मोटारसायकलवरून भरधाव वेगाने येऊन काही क्षणांत दागिने खेचून नेणाऱ्या तीन आरोपींना जेरबंद केले आहे. या घटनांमुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या गंभीर गुन्ह्यांची तात्काळ उकल करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहायक पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे आणि पोलीस उप आयुक्त (गुन्हे शाखा) सचिन गुंजाळ यांनी दिले होते.
त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष 3, पनवेलच्या पथकाने घटनास्थळांची पाहणी करून फिर्यादी आणि साक्षीदारांकडून माहिती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. या तपासाअंती पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मोहम्मद शफिक हनिफ शाह (28), विवेक विश्वनाथ सोनार (25) आणि आदर्श हरिसिंग दर्जी (25) यांना अटक करण्यात आली.
आरोपींकडून सखोल चौकशी केल्यानंतर सुमारे 9 लाख 93 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील 2, कामोठे आणि खारघर पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येकी 1 असे एकूण 4 जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या सर्व गुन्ह्यांतील 100 टक्के मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही प्रभावी कारवाई सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. या अटकेमुळे नवी मुंबई परिसरात दागिने चोरीच्या घटनांना आळा बसेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

