(मुंबई)
चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान मोनोरेल अडकून पडल्याची घटना घडली होती. यानंतर एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांनी लगेच प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले होते. आता मोनो रेलचे रेस्क्यू ऑपरेशन संपले असून एकूण ५८२ लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. कोणतीही जीवित हानी नाही किंवा जखमी नाही.
मुंबईत सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहराची जीवनवाहिनी असलेली लोकल रेल्वे सेवा पूर्णतः विस्कळीत झाली. मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल ८ तास ठप्प होती, तर पश्चिम रेल्वेवर गाड्या अत्यंत धीम्या गतीने धावत होत्या. या परिस्थितीत पर्यायी वाहतुकीचा मार्ग म्हणून अनेक मुंबईकरांनी मोनोरेलची निवड केली. मात्र, संध्याकाळी भक्ति पार्क ते चेंबूर दरम्यान धावणारी मोनोरेल RST-4 अचानक बंद पडल्याने प्रवाशांना दोन तासांहून अधिक वेळ अडकून राहावं लागलं.
मोठ्या गर्दीमुळे मोनोरेलमध्ये बिघाड
चेंबूर आणि भक्ति पार्क स्थानकांदरम्यान संध्याकाळी ६:१५ वाजता मोनोरेल अचानक थांबली. ट्रेन उंचावर असताना खिडक्या आणि दरवाजे बंद होते. लाईट आणि एसी बंद पडल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. गर्दीमुळे उष्णता वाढली आणि श्वास घेण्यास अडचण वाटू लागली. एका प्रवाशाला चक्करही आली.
प्राथमिक तपासणीनुसार, मोनोरेलची एकूण वहनक्षमता १०४ मेट्रिक टन असून, त्यावेळी ट्रेनमध्ये सुमारे ५८६ हून अधिक प्रवासी होते. त्यामुळे एकूण वजन १०९ टनांवर पोहोचले होते. या अतिरिक्त वजनामुळे पॉवर रेल आणि करंट कलेक्टर यांच्यातील यांत्रिक संपर्क तुटला, ज्यामुळे वीजपुरवठा बंद झाला आणि मोनोरेल अचानक थांबली.
तांत्रिक अडचणींमुळे बचावकार्य अडकलं
एमएमआरडीएचे सहआयुक्त, आयएएस अधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी सांगितले की, भारतीय रेल्वे सेवा बंद असल्यामुळे अचानक मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी मोनोरेलचा वापर केला. गर्दी नियंत्रणात आणण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले होते, मात्र प्रवाशांची संख्या इतकी वाढली होती की, ते अपयशी ठरले.
एमएमआरडीएच्या तांत्रिक पथकाने घटनास्थळी तत्काळ धाव घेतली आणि SOP (Standard Operating Procedure) नुसार दुसरी मोनोरेल पाठवून बंद पडलेली मोनो खेचून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, अतिरिक्त वजनामुळे हे शक्य झाले नाही. अखेर, मुंबई अग्निशमन विभागाची मदत घेऊन स्नॉर्कल वाहनांच्या सहाय्याने प्रवाशांचे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले.
MMRDA आणि BMC कडून आवाहन
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) सांगितले की, हेल्पलाइन क्रमांक १९१६ वर प्रवाशांकडून कॉल आल्यानंतर अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ३ स्नॉर्कल वाहनांच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. मोनोरेलमध्ये गर्दी, बंद एसी आणि गरम हवामानामुळे प्रवाशांची अवस्था गंभीर झाली होती. अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता.
एमएमआरडीएने स्पष्ट केलं की, मोनोरेल ही मर्यादित क्षमतेची सार्वजनिक वाहतूक सेवा असून, ती पारंपरिक लोकल वा मेट्रोप्रमाणे मोठ्या प्रमाणात गर्दी वाहून नेण्यासाठी डिझाइन केलेली नाही. भविष्यातील अशा आपत्कालीन परिस्थितींमध्ये प्रवाशांनी सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

