(मुंबई)
आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत तयारीचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत महापालिकेने केलेल्या पूर्वतयारीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
बैठकीला महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल, तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपस्थित होते.
या वेळी मतदारसंख्या, मतदान केंद्रांचे विभाजन, प्रस्तावित केंद्रांचे वर्गीकरण, आवश्यक मतदान यंत्रसामग्री, साठवणुकीची व्यवस्था, निवडणूक साहित्य, मतदान केंद्रावरील सुविधा तसेच निवडणुकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळासह विविध बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला.
“बृहन्मुंबई महापालिकेची निवडणुकीसाठीची पूर्वतयारी परिपूर्ण आहे. मतदान केंद्रांवरील सुविधा वाढवून त्याबाबत प्रभावी जनजागृती करावी, जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढेल. मागील निवडणुकीदरम्यान आलेल्या अडचणींचा विचार करून यंदा अधिक सक्षम उपाययोजना राबवाव्यात. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत व्हावी, यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावीत. सर्वांनी निर्भय व निष्पक्ष कामकाज करावे. विविध यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून कामकाज प्रभावीरीत्या पार पाडावे,” असे निर्देश वाघमारे यांनी दिल्याचे प्रशासनाने सांगितले.

