(चिपळूण / प्रतिनिधी)
चिपळूण शहराच्या मध्यवर्ती ‘हायटेक’ बसस्थानकाचे स्वप्न नागरिकांच्या डोळ्यात रंगवत सुरू झालेले काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. पहिल्या स्लॅबपर्यंतच मर्यादित राहिलेल्या या प्रकल्पाचे उर्वरित बांधकाम गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णतः ठप्प झाले आहे. परिणामी, पावसाळ्याच्या तोंडावर बसस्थानकाचा विषय पुन्हा एकदा प्रवाशांच्या तोंडी आहे.
सात वर्षांपूर्वी, जीर्ण बसस्थानकाची इमारत जमीनदोस्त करून ‘हायटेक’ बसस्थानक बांधण्याचा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र, प्रारंभीच्या ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे कामास सुरुवातीपासूनच खीळ बसली. कामाचा बट्ट्याबोळ झाल्यानंतर महामंडळाने ठेका रद्द करून नवीन ठेकेदाराची नियुक्ती केली. काहीसा दिलासा मिळत पहिला स्लॅब पूर्ण झाला, मात्र त्यानंतर पुन्हा मूकपणे काम थांबले.
दरम्यान, उर्वरित बांधकामासाठी २ कोटींचा निधी मंजूर असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सूत्रांकडून समजते. पण कामाचे आदेश अद्यापही प्रलंबित आहेत. या आदेशासाठीचा खेळखंडोबा किती काळ चालणार? असा संतप्त सवाल चिपळूणकर विचारू लागले आहेत.
विशेष म्हणजे, चिपळूणच्या कामास सुरुवात झाल्यानंतर रत्नागिरी बसस्थानकाचे काम पूर्ण झाले, उद्घाटनही झाले. मात्र चिपळूण मधील बसस्थानकाचे काम तथास्थितीतच आहे. प्रवाशांना सध्या अपुर्या व अस्वच्छ सुविधांमध्ये दिवस काढावे लागत आहेत.
पावसाळा अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपला असताना, उर्वरित कामास गती मिळणार की नाही? असा सततच्या प्रतिक्षेचा आणि निष्क्रियतेचा गहिवर आता नागरिकांच्या मनात दाटू लागला आहे. महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे हे हायटेक स्वप्न केव्हा प्रत्यक्षात उतरणार, याचीच प्रतीक्षा आहे.

